Fri, May 29, 2020 22:01होमपेज › Goa › खाण अवलंबितांसाठी ३.५ हजार कोटींचे पॅकेज द्यावे 

खाण अवलंबितांसाठी ३.५ हजार कोटींचे पॅकेज द्यावे 

Published On: Jan 02 2019 1:56AM | Last Updated: Jan 02 2019 12:21AM
पणजी : प्रतिनिधी

खाणबंदी प्रश्‍नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागण्यात आली असून येत्या 15 दिवसांत भेट निश्चित होणार आहे. याशिवाय, राज्यातील  खाण अवलंबितांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3500 कोटी रूपयांचा मदतनिधी द्यावा, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला खाण उद्योग लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक पॅकेज द्यावे. खाण अवलंबितांच्या मदतीसाठी एकरकमी 3500 कोटी रूपये मिळावेत, अशी मागणी आपण पत्राद्वारे केली आहे, असेही ढवळीकर म्हणाले.  

भाजप आघाडी सरकारातील घटक पक्ष म्हणून आपणही भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आदी भाजप नेत्यांशी चर्चा केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याशीही या प्रश्‍नावर सकारात्मक चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

बंद पडलेल्या खाणी सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेणे आवश्यक असून त्यासाठी मुलाखतीसाठी आपण वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत खाण प्रश्‍नावर तोडगा काढला असून तो समाधानकारक आहे. मात्र हा तोडगा प्रत्यक्षात अस्तित्वात आला नाही तर केंद्रीय खाण कायद्यानुसार, अन्य राज्यांप्रमाणे गोव्यातील खाणींचाही लिलाव होणेे निश्‍चित असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. 

कायदा दुरूस्ती प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन

राज्य सरकारने केंद्रीय ‘एमएमडीआर कायदा 1957 ’ मध्ये दुरुस्तीची मागणी करणारा प्रस्ताव केंद्रीय खाण मंत्रालयाकडे पोचला आहे. या प्रस्तावावर खाण खात्याकडून अभ्यास सुरू असल्याची माहिती केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सोमवारी राज्यसभेत दिली आहे. खासदार संजय सिंग यांनी विचारलेल्या प्रश्नावर सदर उत्तर देण्यात आले आहे.