Mon, May 25, 2020 04:14होमपेज › Goa › पंतप्रधान मोदी यांनी केला गोव्यावरील विश्वास वृद्धींगत : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

पंतप्रधान मोदी यांनी केला गोव्यावरील विश्वास वृद्धींगत : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

Published On: Jun 02 2019 8:18PM | Last Updated: Jun 02 2019 8:18PM
पणजी : प्रतिनिधी

संरक्षण खाते हे महत्वाचे खाते असून माजी संरक्षणमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची राज्यासंबंधी अपूर्ण राहिलेली स्वप्ने व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण झटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यावरील असलेला विश्वास आणखी वृद्धींगत करून आयुष सोबत संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद देऊन आपला नव्हे तर गोमंतकीयांचा सन्मान केला असल्याचे भावपूर्ण शब्द केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. 

नाईक यांचे सोमवारी राज्यात जंगी स्वागत करण्यात आले. खासदार नाईक यांचे विमान दूपारी 2 वाजता दाबोळी विमानतळावर उतरले. विमानतळावर शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. नगर विकासमंत्री  मिलींद नाईक , संघटन मंत्री सतीश धोंड यांनीही हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. विमानतळाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवून, फटाके फोडून व घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. 

दाबोळीहून नाईक यांची खूल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. बांबोळी येथील मिलीटरी कॅम्पपासून पणजी शहरापर्यंत काढलेल्या भव्य रॅलीत असंख्य भाजप  कार्यकर्ते सामील झाले होते. ही रॅली शहरात फिरून भाजप कार्यालयात आणण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस सदानंद तानावडे, दामू नाईक व अन्य भाजप  कार्यकर्त्यांनी नाईक यांचे हार घालून तसेच फुलाचा वर्षाव करून स्वागत केले. भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व घोषणा देऊन आपला उत्साहात त्‍यांचे स्‍वागत केले.