Thu, May 28, 2020 07:46होमपेज › Goa › राज्यातील अन्य दुकाने उद्यापासून खुली

राज्यातील अन्य दुकाने उद्यापासून खुली

Last Updated: Apr 26 2020 1:02AM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा

देशातील कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसंबंधी काही निर्बंध केंद्रीय गृहमंत्रालयाने शिथिल केले असून केंद्रशासित प्रदेशांसह सर्व राज्यांतील महानगरपालिका व पालिका क्षेत्रांतील अत्यावश्यक वस्तूंची सोडून अन्य दुकाने व आस्थापने सोमवारपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. तत्ससंबंधीचा आदेश शुक्रवारी दि. 24 एप्रिल रोजी रात्री उशिरा जारी करण्यात आला असून या आदेशानुसार महानगरपालिका व पालिका क्षेत्रातील बाजारपेठा व निवासी वसाहतीत असलेली लोकांच्या गरजेची सगळीच दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. 

हार्डवेअर, सिमेंट, कापड विक्रीचे दुकान, रेडीमेड गारमेंटचे दुकान, शिंप्याचे दुकान, दुचाकी व चारचाकी वाहनांचे सुटे भाग विक्रीचे दुकान, वाहन दुरूस्ती गॅरेज, बॅटरी, स्पोर्टस् गुड्स, इलेक्ट्रिकल्स गुड्स, बिल्डिंग मटेरियल्स, लोखंड विक्रीची दुकाने व अन्य प्रकारची लोकांच्या गरजेची वाटणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र जीम, चित्रपटगृहे, सार्वजनिक जलतरण तलाव, कॅसिनो, स्पा आणि मसाज पार्लर, सलून, रिव्हर-क्रुझ, नाईट क्लब व मल्टीप्लेक्स हे व्यवहार सुरू करता येणार नाहीत. हे सर्व व्यवसाय व आस्थापने आधीच्या आदेशानुसार बंदच ठेवावी लागणार आहेत. 

राज्यात सुरु करण्यात येणार्‍या या दुकानांत व आस्थापनांत कामगारांनी तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे आहे. दुकानमालक व आस्थापनांच्या मालकांनी आळीपाळीने 50 टक्के कामगार घेऊन व्यवसाय सुरू करावा. ग्राहकांनी निहित अंतर ठेवून खरेदी करावी. लॉकडाऊनच्या काळात व्यवसायिक व ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून थोड्या प्रमाणात शिथिलता करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी सरकारने लागू केलेले नियम व अटींचे पालन करून व्यवसाय करावा, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशात देण्यात आले असून नियमांचे उल्लघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे.

पणजी महानगरपालिकेसह मडगाव, म्हापसा, वास्को, फोंडा, कुडचडे, केपे, सांगे, काणकोण, कुंकळ्ळी, वाळपई, डिचोली व पेडणे पालिकाही व्यवसाय सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र मद्य व्यवसाय सुरू करण्यासाठी निर्बंध ठेवण्यात आले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या काळात शिथिलता आणून महानगरपालिका व पालिका क्षेत्रांतील बाजारपेठा खुल्या करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे राज्य सरकारने स्वागत केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून 50 टक्के कामगारांना घेऊन बाजारपेठांतील व्यवसाय सुरू केले जाणार आहेत. पालिकांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

दुकान मालकांनी 50 टक्के कामगारांना घेऊन आपले वरील व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी आहे. एका दुकान मालकाकडे 6 कामगार असतील, तर त्यांनी 3 कामगारांना घेऊन दुकान सुरू करावे. दुसर्‍या दिवशी इतर 3 कामगारांना बोलावून घ्यावे, अशी अट आदेशात नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील महानगरपालिका व इतर शहरांतील पालिका बाजारपेठांत व्यवसाय सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे.