Tue, May 26, 2020 06:22होमपेज › Goa › विरोधी आमदारांना  काढले सभागृहाबाहेर 

विरोधी आमदारांना  काढले सभागृहाबाहेर 

Last Updated: Feb 06 2020 11:24PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा  

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी अपरात्री अटक करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी विरोधी आमदारांनी  विधानसभेत गदारोळ  माजवला. विरोधक घोषणाबाजी करत सभापतीपुढील हौदात उतरल्यानंतर सभापतींनी विरोधकांना मागे जाण्याचे आदेश दिले. सभापतींच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने सभापतींनी विरोधी आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले.  त्यानुसार सभागृहातील मार्शलनी विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढले. 

विधानसभेच्या दुपारच्या सत्रात विरोधी आमदारांनी घोषणाबाजी करायला सुरूवात केल्याने सभापतींनी कामकाज तहकूब केले. त्यानंतर सभापतींनी विरोधी आमदारांना चर्चेसाठी बोलविले. मात्र, पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.   मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरूवात केल्यानंतर विरोधकांनी सभापतींच्या हौदात उतरून ‘शेम शेम’ अशी  घोषणाबाजी सुरू केली.

यावेळी सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्यापेक्षा सभागृहाबाहेर जाण्याचे आवाहन सभापतींनी केले. मात्र विरोधकांनी माघार घेण्यास विरोध करत, घोषणाबाजी सुरूच ठेवली. विरोधकांच्या सलग घोषणाबाजीमुळे गुरूवारी सभागृहाचे कामकाज बराच वेळ रखडले होते.सभापतींनी दोन ते तीन वेळा माघार घेण्यास सांगितल्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी थांबविली नाही. त्यामुळे  विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, रवी नाईक यांच्यासह अन्य आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश सभापतींनी मार्शलला दिले.

सभागृहात लोकशाहीची हत्या होत असून आम्हाला न्याय हवा, अशी मागणी विरोधी पक्षातील आमदारांनी सभागृहात केली. विरोधकांनी ‘आम्हाला न्याय हवा’ च्या घोषणा दिल्या.