Thu, May 28, 2020 20:13होमपेज › Goa › व्याघ्र क्षेत्रास विरोध, टायगर कॉरिडोर करा

व्याघ्र क्षेत्रास विरोध, टायगर कॉरिडोर करा

Last Updated: Jan 11 2020 2:01AM
पणजी : प्रतिनिधी
सत्तरी मतदारसंघातील लोकांच्या विकासाला बाधा ठरण्याची शक्यता असल्याने म्हादई अभयारण्यात ‘व्याघ्र क्षेत्र’ जाहीर करण्यास आपला प्रखर विरोध राहील. याआधी, तत्कालीन राज्यपाल जे. एफ. आर. जेकब यांनी कोणालाही विश्‍वासात न घेता म्हादई वनक्षेत्र अभयारण्य म्हणून जाहीर केल्याने स्थानिकांना त्रास होत आहे. त्यासाठी ‘व्याघ्र क्षेत्र’ न करता ‘टायगर कॉरिडोर’ करावा, त्यास आपली हरकत नाही , असे  आरोग्यमंत्री तथा वाळपईचे आमदार विश्‍वजीत राणे यांनी शुक्रवारी सांगितले.

कला अकादमी येथे एका सरकारी कार्यक्रमास आले असता  मंत्री राणे यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्तरी-गोळावली येथे चार वाघांच्या मृत्यूनंतर तो भाग ‘व्याघ्र क्षेत्र’ म्हणून जाहीर करणार असल्याचे गुरुवारी सांगितले होते.  याविषयी बोलताना राणे म्हणाले की, सत्तरीत ‘व्याघ्र क्षेत्र’ जाहीर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. सत्तरीचे लोक कथित ‘व्याघ्र क्षेत्र’ला मान्यता देणार नाही. पर्यावरणप्रेमींनी आम्हाला याविषयी ज्ञान शिकवू नये. अभयारण्यात ‘व्याघ्र क्षेत्र’ जाहीर केल्यास  सत्तरीतील विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. मुळात सत्तरीत वाघ आहेत, हेच आपल्याला माहीत नव्हते. वाघ हा प्राणी भटका  असून तो कर्नाटक - गोवा राज्याच्या सीमेतून सत्तरीत दाखल झाला असावा. त्यासाठी हवे तर आम्ही वाघांच्या येण्या- जाण्याची  वाट एखादा ‘बफर झोन ’ तयार करून राखून ठेवू शकतो. मात्र, त्यासाठी खास ‘व्याघ्र क्षेत्र’ स्थापन करण्याची आवश्यकता नाही. ‘व्याघ्र क्षेत्र’ असे सहजरीत्या निर्माण केले जात नाही. त्यासाठी विशेष अभ्यास  करण्याची आवश्यकता असल्याचे राणे यांनी सांगितले. 

याआधी,  जे.एफ. आर. जेकब यांनी  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानंतर गोव्यात म्हादईसह तीन अभयारण्ये अधिसूचित केली होती. या निर्णयाचा मंत्री राणे यांनी शुक्रवारी निषेध व्यक्त केला आहे.