Wed, May 27, 2020 05:03होमपेज › Goa › प्रत्येक मतदारसंघातून एक ते दीड हजार कार्यकर्ते मोदींच्या सभेला येणार : मुख्यमंत्री

प्रत्येक मतदारसंघातून एक ते दीड हजार कार्यकर्ते मोदींच्या सभेला येणार : मुख्यमंत्री

Published On: Apr 09 2019 1:56AM | Last Updated: Apr 09 2019 1:47AM
पणजी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  10 एप्रिल रोजी  डॉ.शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार्‍या   सभेनंतर कार्यकर्ते दुप्पट जोमाने कामाला लागतील      आणि मोठ्या मताधिक्क्याने भाजप  उमेदवारांना निवडून आणतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  सोमवारी     येथील भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येकी एक ते दीड हजार कार्यकर्ते सभेला उपस्थित राहतील,असेही त्यांनी सांगितले.

राज्यात भाजपच्या निवडणूक  प्रचाराची दुसरी फेरी पंतप्रधानांच्या सभेने पूर्ण होणार आहे.त्यानंतर तिसर्‍या टप्प्यातील प्रचार फेरी सुरु होणार आहे.तिसर्‍या फेरीत प्रत्येक मतदार संघात मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे. सध्यस्थिती   पाहता आम्ही पाचही निवडणुका शंभर टक्के जिंकू यात शंका नाही,असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

राज्यात होणार्‍या विधानसभेच्या  पोटनिवडणुकांतील तीन जागा आणि लोकसभेच्या दोन्ही जागा  भाजप जिंकणार आहे.प्रचाराच्या दुसर्‍या फेरीची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  बुधवारच्या  जाहीर सभेने होणार आहे.सर्वत्र  भाजपचे वातावरण असून केंद्रात देखील पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल,असा विश्वासही सावंत यांनी  व्यक्त केला.

पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद तानावडे, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीबाबत माहिती देताना खासदार तेंडुलकर यांनी सांगितले,की सध्या वातावरणात उष्मा वाढला असल्याने बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वातनाकुलित स्टेडियम मध्ये बुधवारी सायंकाळी 4 वाजता  सभा आयोजित करण्यात आली आहे.स्टेडियम मध्ये 15 हजार आसन व्यवस्था  असेल शिवाय स्टेडियम बाहेर मंडप घालण्यात येणार असून  मोठ्या स्क्रीन्स बसवणार आहेत.तेथे  10 हजार लोक बसतील,अशी व्यवस्था केली जाणार आहे.मोदी यांच्या प्रचार सभेसाठी प्रत्येक मतदारसंघात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघातून हजार ते दीड हजार कार्यकर्ते मोदी यांच्या सभेसाठी उपस्थित राहतील, असे  तेंडुलकर यांनी सांगितले.