Wed, Jul 08, 2020 14:13होमपेज › Goa › ८०० पूरग्रस्त कुटुंबांना दीड कोटींची मदत 

८०० पूरग्रस्त कुटुंबांना दीड कोटींची मदत 

Published On: Aug 28 2019 1:45AM | Last Updated: Aug 28 2019 1:45AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील पूरग्रस्तांपैकी 800 कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 1.50 कोटी रुपयांचा मदतनिधी वितरीत केला जाणार आहे. पूरग्रस्तांना पूणर्र्तः मदत मिळेपर्यंत मदतनिधी वितरणाचे काम सुरू ठेवले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे एका खासगी कार्यक्रमाला आले असता पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना सांगितले.

ज्या लोकांनी नुकसान भरपाईसाठी अद्याप अर्ज केला नाही, त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना भेटून माहिती द्यावी. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना लवकरच मदत दिली जाणार आहे. ज्यांची घरे नष्ट झाली आहेत, त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणि अटल आसरा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंत यांनी केले. 

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पुरामुळे नुकसान झालेल्यांना सरकारने अवघ्या काही दिवसांतच नुकसानभरपाई दिली आहे. पहिल्यांदाच असा प्रयत्न झाला आहे. यापूर्वी पूरग्रस्तांना अवघ्या 2 ते 3 हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जात असे. मात्र, ही रक्कम फारच कमी असल्याने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किमान 10 हजार रु. देण्यात आले आहेत. याचप्रमाणे पूर्ण घर जमीनदोस्त झालेल्यांना 1.10 लाख रुपये देण्यात आले आहेत. 

राज्यातील अनेक घरांची आणि शेतीची नुकत्याच आलेल्या पुरामुळे मोठी हानी झालेली आहे. सरकारने दिलेल्या आश्‍वासनानुसार गणेश चतुर्थीच्या आधी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती थोपवणे आमच्या हातात नाही, मात्र पूरग्रस्तांना मदत करण्यात कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही. आपत्तीच्या प्रसंगात सरकार नेहमीच लोकांच्या पाठीशी राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
उत्तर गोव्यातील पेडणे, 

बार्देश, डिचोली आणि तिसवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांना मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मदतनिधीचे धनादेश वितरीत करण्यात आले. त्यावेळी सावंत यांच्यासोबत महसूल खात्याच्या मंत्री जेनिफर मोन्सेरात, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, अतिरिक्त जिल्हाधिकारी दशरथ रेडकर व अन्य सरकारी अधिकारी उपस्थित होते.तिसवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांना पर्वरी येथील सचिवालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.