Thu, Jul 02, 2020 13:55होमपेज › Goa › राज्यात आता ‘112’ एकमेव हेल्पलाईन

राज्यात आता ‘112’ एकमेव हेल्पलाईन

Published On: Sep 17 2019 1:50AM | Last Updated: Sep 17 2019 1:50AM
पणजी : प्रतिनिधी

सध्या ‘100’ (पोलिस); ‘101’ (अग्निशामक) आणि ‘108’ (वैद्यकीय) मदतीसाठी वेगवेगळे क्रमांक वापरले जात असून आपत्कालीन सर्वसमावेशक सेवा देणारी ‘युनिव्हर्सल हेल्पलाईन’ क्रमांक- ‘112’ची चाचणी राज्यात यशस्वीरीत्या पार पडली असून ती कधीही कार्यान्वित होऊ शकते, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिली.

गोवा पोलिस नवी ‘112’ हेल्पलाईन सुरू करणार असल्याचे याआधी तीनवेळा घोषित करण्यात आले होते. सर्वात आधी 19 डिसेंबर-2018 रोजी गोवा मुक्तिदिनी ही हेल्पलाईन सुरू होणार होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी मे मध्ये आणि 15 ऑगस्ट रोजी ही यंत्रणा सुरू करण्याचे सरकारने ठरवले होते, मात्र प्रत्यक्षात हेल्पलाईन सुरू होऊ शकली नव्हती. 

या विषयी सिंग यांनी सांगितले की, सुमारे 10 कोटी रुपये खर्चून नवीन ‘युनिव्हर्सल हेल्पलाईन’ क्रमांक- ‘112’ उभारण्याची प्रक्रिया राज्यात पूर्ण करण्यात आली आहे. पोलिसांचे सर्व नियंत्रण कक्ष या यंत्रणेला जोडले जाणार आहेत. या क्रमांकावर आलेले सर्व कॉल संबंधितांच्या गरजेनुसार त्या-त्या आपत्कालीन केंद्रांकडे पाठवले जाणार आहेत. या यंत्रणेच्या मुख्य केंद्राकडे राज्यातील सर्व आपत्कालीन कामासाठी वापरल्या जात असलेल्या वाहनांचे स्थान दिसून येणार आहे. यामुळे घटनास्थळाच्या जवळच्या वाहनाला त्या जागी वळवण्यात येणार आहे. 

पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाचे प्रतिनिधी एकाचवेळी या यंत्रणेशी जोडले जाणार आहेत. या तिन्ही यंत्रणेसंबंधी सध्या सुरू असलेले नियंत्रण कक्ष सुरू राहणार असले तरी त्यांचे सर्व फोन क्रमांक ‘112’ या एकाच यंत्रणेकडे जोडले जाणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.