Tue, Jul 14, 2020 09:40होमपेज › Goa › स्वयंसेवी संघटनांकडून राज्याच्या विकासात आडकाठी : मुख्यमंत्री

स्वयंसेवी संघटनांकडून राज्याच्या विकासात आडकाठी : मुख्यमंत्री

Last Updated: Feb 22 2020 1:34AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 
राज्यात सरकारकडून नवा प्रकल्प उभारण्याची तयारी करताच त्याला स्वयंसेवी संघटनांकडून विरोध केला जातो. स्वयंसेवी संघटनांकडून राज्याच्या विकासात आडकाठी आणली जाते. त्यामुळे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काय चांगले आहे, याचा विचार आता जनतेनेच करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पणजी येथील बंदर कप्तान खात्याच्या जेटीवर उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या तरंगत्या जेटीच्या उद्घाटनावेळी केले. आता पुढील तीन महिन्यांत राज्यात आणखीन नव्या तीन तरंगत्या जेटींचे उद्घाटन केले जाईल. या प्रकल्पांमुळे पर्यटक गोव्याकडे आकर्षित तर होतीलच, पण रोजगार संधीदेखील तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोव्यात एकाचवेळी चार तरंगत्या जेटी उभारणे ही राज्याच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. मात्र सरकारकडून नव्या विकास प्रकल्पाचे काम हाती घेताच त्याला स्वयंसेवी संघटनांकडून विरोध होण्यास सुरुवात होते. स्वयंसेवी संघटनांकडून गोव्याच्या विकासकामांमध्ये आडकाठी केली जाते. प्रकल्प नक्की काय आहे, तो जनतेच्या हिताचा कसा आहे, याची कसलीच माहिती न घेता त्याला विरोध करण्यास सुरुवात केली जाते. या सर्वांच्या मागे एक विशिष्ट शक्ती आहे. केवळ विरोध करायचा म्हणूनच विरोध केला जातो. राज्य किंवा केंद्र सरकारकडून जेव्हा गोव्यात मोठे विकास प्रकल्प राबवण्याची तयारी केली जाते तेव्हा त्याला स्वयंसेवी संघटनेकडून विरोध हा होतोच, अशी टीका त्यांनी केली.

तरंगत्या जेटीच्या माध्यमातून गोव्याच्या अर्थव्यवस्थेची दारे अधिक खुली झाली आहेत. केंद्राकडून लवकरच गोव्यात मरीन या विषयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून यामुळे मरीन क्षेत्रात युवकांना रोजगार संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गोव्यात अंतर्गत जलवाहतुकीचा  फार कमी वापर होतो. मात्र, अशा प्रकारच्या तरंगत्या जेटींमुळे अंतर्गत जलवाहतुकीला चालना मिळण्याबरोबरच प्रकल्पांमुळे गोव्याकडे पर्यटक मोठ्या संख्येने आकर्षित होण्याबरोबरच स्थानिकांना रोजगार संधीदेखील तयार होतील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मंदाविया म्हणाले की, तरंगत्या जेटीच्या माध्यमातून गोव्यातील अंतर्गत जलवाहतुकीची दारे खुली करण्यात आली आहेत. या प्रकल्पांमुळे केवळ जलवाहतुकीचा विकास तर होईल, पण त्याचबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेलादेखील बळकटी प्राप्त होणार आहे.

कमी खर्चात व काँक्रीटव्दारे ही तरंगत्या जेटीची उभारणी करण्यात आली आहे. गोवा हे किनारी राज्य असून याठिकाणी ही तरंगती जेटी उभारण्याचा प्रयोग पहिल्यांदा करण्यात आला असून त्यानंतर अन्य राज्यांमध्ये त्या उभारल्या जातील. गोव्यात केंद्र सरकारकडून लवकरच किनारी मरीन इन्स्टिट्यूटची शाखा सुरू केली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर गोव्यातील युवकांना देश-विदेशात खलाशी म्हणून रोजगारसंधी प्राप्त होण्यास मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले. 

बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो म्हणाले, तरंगती जेटी ही जनतेसाठी सुरक्षित आहे. अशा जेटींमुळे गावांना अंतर्गत जलवाहतुकीद्वारे जोडण्यास मदत होणार आहे. पणजी येथील बंदर कप्तान खात्याच्या जेटीनंतर चोपडे, जुने गोवे तसेच पणजी येथील फेरीबोटीनजीक, अशा तीन तरंगत्या जेटी उभारल्या जाणार आहेत. यामुळे पर्यटनाला तर चालना मिळेलच पण त्याचबरोबर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासदेखील मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, बंदर कप्तान खात्याचे सचिव पी. ए. रेड्डी व अन्य अधिकारी उपस्थित होते.