Thu, Jul 02, 2020 14:02होमपेज › Goa › महिलांना रात्रपाळीसंबंधी दुरुस्ती विधेयक संमत

महिलांना रात्रपाळीसंबंधी दुरुस्ती विधेयक संमत

Published On: Aug 02 2019 1:16AM | Last Updated: Aug 02 2019 1:16AM
पणजी : प्रतिनिधी

कामाच्या तासांत वाढ तसेच महिलांना रात्रपाळीची मुभा देणारे गोवा कारखाना व बाष्पक दुरुस्ती विधेयक विधानसभेत 26 विरुद्ध 5 मतांनी संमत झाले. या दुरुस्ती विधेयकाला विरोधी पक्षाच्या आमदारांनी विरोध करून हे विधेयक अभ्यासासाठी चिकित्सा समितीकडे पाठवले जावे, अशी मागणी केली; मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आली. 

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले, गोवा कारखाना व बाष्पक दुरुस्ती विधेयक हे कामगारविरोधी आहे. आठवड्यातील कामाचे तास 60 वरून 70 करण्यात आले आहेत. उद्योगांना हे दुरुस्ती विधेयक फायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला. या दुरुस्तीनुसार महिलांना संध्याकाळी 7 नंतर रात्रपाळीत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.     

मात्र, या महिलांच्या सुरक्षेसंबंधी काहीच नमूद नाही. एकदा हा कायदा संमत झाला की महिलांना रात्रपाळीत काम करणे सक्‍तीचे ठरेल. तिच्या मान्यतेचा प्रश्‍नच देणार नाही. त्यामुळे हे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवले जावे, अशी मागणी त्यांनी केली.

गोवा कारखाना व बाष्पक खात्याचे मंत्री बाबू कवळेकर म्हणाले, महिलांना समान दर्जा देण्याच्या दृष्टीने हे दुरुस्ती विधेयक फार महत्वाचे आहे. महिला अनेकदा रात्रपाळीत काम करु शकत नाहीत. महाराष्ट्रात असा कायदा असून अनेक राज्यांमध्ये महिला रात्रपाळीत काम करतात, असे त्यांनी सांगितले.

रात्रपाळीत काम करताना महिला कामगारांची मान्यता संबंधीत कंपनीने घेणे आवश्यक आहे. रात्रपाळीत काम करण्यासाठी तिची मान्यता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार रवी नाईक म्हणाले, महाराष्ट्र, बंगळूर या मोठ्या महानगरांशी गोव्याची तुलना करु नये. रात्रपाळीत काम करणार्‍या महिला कामगार पहाटे सुखरुप घरी पोचायला हव्यात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार. रात्रपाळी सक्‍तीला जर तिने नकार दिला तर काय होईल, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, सदर दुरुस्ती विधेयक कामगारांच्या फायद्यासाठी आहे. रात्रपाळीसाठी कामगारांची मान्यता घेण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेची तरतूद यात आहे. त्यामुळे हे दुरुस्ती विधेयक चिकित्सा समितीला पाठवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.