Wed, Jul 08, 2020 13:52



होमपेज › Goa › नवे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा आज शपथविधी

नवे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा आज शपथविधी

Last Updated: Nov 02 2019 11:55PM




पणजी : प्रतिनिधी

गोव्याचे नवनियुक्‍त राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा रविवारी  (दि.3) शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दोनापावला येथील राजभवनात आयोजित सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग हे मलिक यांना राज्यपालपदाची व गोपयनीयतेची शपथ देतील.

शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता पार पडेल. मलिक हे काल, शनिवारी गोव्यात दाबोळी विमानतळावर विशेष विमानाव्दारे दाखल झाले. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मंत्री मिलींद नाईक तसेच अन्य अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राजभवन येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी असलेले सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

डॉ. मृदुला सिन्हा या ऑगस्ट 2014  पासून गोव्याच्या राज्यपालपदी होत्या. स्वच्छ भारत अभियानसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांची राजदूत म्हणून नियुक्‍ती करण्यात आली होती. सत्यपाल मलिक हे 73 वर्षांचे असून गोव्याच्या राज्यपालपदी करण्यात आलेल्या त्यांच्या नियुक्‍ती संदर्भातील आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काही दिवसांपूर्वीच जारी केला होता.