Wed, May 27, 2020 04:55होमपेज › Goa › भाजपविरोधी तक्रारींकडे आयोगाकडून दुर्लक्ष

भाजपविरोधी तक्रारींकडे आयोगाकडून दुर्लक्ष

Published On: Apr 01 2019 1:06AM | Last Updated: Apr 01 2019 12:10AM
पणजी : प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाने राज्यात विविध मार्गांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे. गोवा प्रदेश काँग्रेसने 21 मार्च रोजी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंद केली होती. मात्र, आजवर त्या तक्रारींवर कारवाई झालेली नसून आयोगाकडून काही प्रतिसादही मिळाला नाही. यावरून भाजपच  निवडणूक आयोग चालवत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत केली.
डिमेलो म्हणाले, आचारसंहिता लागल्यानंतर निवडणूक आयोगाचे काम फार महत्त्वाचे असते. आयोगाकडे आलेल्या कुठल्याही तक्रारीवर 48 तासांत कारवाई होईल व तक्रार करणार्‍याला त्याचे उत्तर मिळेल, असे आयोगाकडून सांगण्यात आले होते. काँग्रेसने केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले, यावर आयोगाने  माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला भाजप सरकारच चालवत आहे, असा संशय  त्यांनी व्यक्त केला. 

सरकारी मालमत्तेचा भाजपच्या वैयक्तिक कामांसाठी वापर केला जात आहे. सरकारी कार्यालयीन  परिसरातील जागा ही कुणाच्याही वैयक्तिक कामासाठी नसते हे भाजपने समजून घ्यावे. भाजपच्या बैठका सरकारच्या जागेत होतात. त्याचबरोबर आचारसंहिता लागू असताना भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांकडून सरकारच्या वाहनांचा वापर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केला जातो. उमेदवारी अर्ज भरणे ही वैयक्तिक बाब असून सदर वाहने केवळ कार्यालयीन कामकाजासाठी आहेत, हे भाजपच्या उमेदवारांना माहीत असायला हवे, असेही डिमेलो यांनी सांगितले. 
पत्रकार परिषदेत अ‍ॅड. रोहित ब्रास डिसा,  प्रवक्ते विठू मोरजकर व फ्रान्सिस फर्नांडिस  उपस्थित होते.