Fri, Sep 20, 2019 21:53होमपेज › Goa › राज्यात अवयवदानाबाबत जागृती आवश्यक

राज्यात अवयवदानाबाबत जागृती आवश्यक

Published On: Dec 12 2018 1:50AM | Last Updated: Dec 12 2018 12:10AM
पर्वरी : वार्ताहर 

जगात अवयवदानाबद्दल  जागृती चालू असून आपल्या देशातदेखील अवयवदानबद्दल जागृती करणे ही काळाची गरज आहे. इतर देशातील लोक अवयवदानासाठी आपणहून पुढे येत आहेत. त्यामानाने भारत देश  मागे आहे. गोव्यात ही स्थिती अत्यंत नगण्य आहे. माणूस मेल्यानंतर किंवा जीवंत असताना आपल्या शरीरातील एखादा अवयव दान करून दुसर्‍या व्यक्तीला जीवदान देण्या सारखे पुण्य नाही, असे प्रतिपादन  डॉ.गौतम दुभाषी यांनी केले.

पर्वरी ज्येेष्ठ नागरिक मंच, पेन्ह दी फ्रान्क पंचायत आणि वाचनालय यांच्या विद्यमाने  पर्वरीत आयोजित केलेल्या अवयवदान जागृती कार्यक्रमात डॉ. दुभाषी बोलत होते.  व्यासपीठावर महसूल मंत्री रोहन खंवटे, सरपंच स्वप्नील चोडणकर, मंचाचे अध्यक्ष अनिल राजे, डॉ. नारायण हेदे, वाचनालय अध्यक्ष अनुराग गुप्ता होते.

डॉ. दुभाषी म्हणाले, की आज देशात जवळजवळ अडीच लाख लोक वेगवेगळ्या अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत पण आमच्याजवळ संपूर्ण भारतात केवळ तीन हजार अवयव दाते आहेत. त्यामुळे योग्यवेळी एखाद्याला अवयव मिळाला नाही म्हणून त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ  येत आहे. याचे गांभीर्य ओळखून अनेक लोकांनी अवयव दानासाठी पुढे येण्याची गरज आहे.

विज्ञानामुळे आज जवळजवळ सर्व अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य आहे. त्यासाठी इच्छुक दात्यांनी योग्य संकेतस्थाळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच जोपर्यंत राज्यात  राज्य अवयव आणि पेशी प्रत्यारोपण केंद्राची स्थापना होत नाही. तोपर्यंत अवयवदानासाठी लोक पुढे येणार नाहीत. राज्यात अवयव प्रत्यारोपण यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा मोडणे काही कुटुंबाना जड जाते. त्यासाठी अवयवदानाविषयी जागृती करणे गरजेचे आहे, असे डॉ. दुभाषी यांनी सांगितले.

पर्वरीवासियासाठी येणार्‍या काळात पेन्ह दी फ्रान्क पंचायत परिसरात साडेतीन हजार चौरस मीटर जागेत सर्व सोयीयुक्‍त स्मशानभूमी उभारणार आहोत, अशी माहिती महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. रोहन खंवटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  अनिल राजे यांनी स्वागत केले. गोविंद हवालदार यांनी सूत्रसंचालन केले.