Thu, Jul 02, 2020 15:44होमपेज › Goa › वेर्णात नौदलाचे मिग विमान कोसळले

वेर्णात नौदलाचे मिग विमान कोसळले

Last Updated: Nov 17 2019 1:23AM
दाबोळी : प्रतिनिधी

भारतीय नौदलाच्या मिग-29 के लढाऊ जेट विमानाच्या इंजिनाने पेट घेतल्याने दाबोळी विमानतळापासून काही अंतरावर वेर्णा येथे हे विमान कोसळले. विमानातील दोघे शिकाऊ वैमानिक पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या उतरल्याने सुखरूप बचावले. मात्र, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. भारतीय नौदलाच्या इतिहासात मिग-29 के विमानाला अपघात घडण्याची ही पहिलीच वेळ असून भारतीय नौदलाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

मिग-29 के या लढाऊ विमानाने शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दाबोळी विमानतळावरून सरावासाठी झेप घेतल्यानंतर काही क्षणांत विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनाला आग लागल्याचे विमानातील कॅप्टन एम. शिवखंड व लेफ्ट. कमांडर दीपक यादव या शिकाऊ वैमानिकांना लक्षात आले. तसेच डाव्या बाजूच्या इंजिनातून धूर येत असलेला दिसला. या  वैमानिकांनी क्षणाचाही विलंब न करता लढाऊ विमान विमानतळापासून दूरच्या अंतरावर उघड्या असलेल्या खुल्या जागेत उतरवण्याचा प्रयत्न केला. पण आग आणखी भडकल्याने वैमानिकांनी पॅराशूटद्वारे खाली उड्या घेतल्याने दोघे सुखरूप जमिनीवर उतरले. विमानाचे भाग आगीमुळे विखरून खाली पडले. लढाऊ विमान थोड्या अंतरावर जाऊन कोसळले. त्यानंतर आगीचा मोठा भडका उडून विमानाने पेट घेतला. 

या मिग-29 के विमानाचा नियमित सराव व प्रशिक्षणासाठी उपयोग केला जात असे. त्यानुसार शनिवारी दुपारी 12 वाजता शिकाऊ वैमानिक कॅप्टन एम. शिवखंड व लेफ्ट. कमांडर दीपक यादव यांनी सरावासाठी झेप घेतली असता इंजिनमध्ये आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकवस्तीपासून दूर त्यांनी विमान नेल्याने मोठा अनर्थ टळला. 

दुर्घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्यास सुरुवात केली. तसेच दुर्घटनाग्रस्त विमानातून निघालेले धुराचे लोट दूरवर दिसू लागल्याने लोकांनीही तेथे धाव घेतली. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दल, मडगाव व फोंडा येथील 

अग्निशामक दलाला पाचारण करून सदर विमानाला लागलेली आग आटोक्यात आणली. सदर विमानाला लागलेल्या आगीमुळे विमानाचे भाग विमान खाली कोसळून विखरून पडले. यावेळी वेर्णा पोलीस, वास्को पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणले.

अपघाताची माहिती मिळताच नुवेचे आमदार विल्र्फेड डिसा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जवळपास राहणार्‍या लोकांनी दोन्ही वैमानिकांना मदतीचा हात देऊन त्यांच्यावर एका घरात औषधोपचार केला. नंतर त्यांना पोलिसांनी वास्को येथे इस्पितळात पुढील उपचारासाठी दाखल केले.

घटनास्थळी दक्षिण गोवा अधीक्षक अरविंद गावस मुरगावचे तालुका उपअधीक्षक राजू राऊत देसाई, कोलवा पोलीस निरीक्षक नेल्सन कुलासो, वेर्णा पोलीस निरीक्षक हरीश मडकईकर, मडगाव पोलीस निरीक्षक गुरुदास कदम, मडगाव वाहतूक पोलीस निरीक्षक सुरज सामंत, वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर, माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा आदींनी धाव घेऊन घटनास्थळी पाहणी केली.

एका घराचे नुकसान

साल्वादोर वाड्यावरील एका घरावर जळत्या विमानाचा सुटा भाग पडल्यामुळे त्या घरातील स्वयंपाकघर जळाले तसेच वॉशिंग मशीन जळून घरमालकाचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. यावेळी स्वयंपाकघरात कोणी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला.