Mon, May 25, 2020 11:29होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर चतुर्थीनंतर आंदोलन : गावकर

मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर चतुर्थीनंतर आंदोलन : गावकर

Published On: Sep 04 2019 1:52AM | Last Updated: Sep 04 2019 1:52AM
पणजी : प्रतिनिधी
गणेश चतुर्थीपूर्वी खाण अवलंबितांना 1 लाख रुपयांचे अर्थसाह्य द्यावे, या गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटच्या मागणीला सरकारने कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. मागणी मान्य न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या साखळी येथील निवासस्थानाबाहेर चतुर्थीनंतर आंदोलन करण्याचा इशारा फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी दिला.

गावकर म्हणाले की, राज्यातील खाणी बंद असल्याने सध्या खाण अवलंबितांसमोर आपल्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खाणी कधी सुरू करणार याबाबतचे ठोस आश्‍वासन देण्यातदेखील सरकारला अपयश आल्याची टीका त्यांनी केली.

खाणी बंद असल्याने घरात गणेश चतुर्थी कशी साजरी करायची, हा प्रश्‍न खाण अवलंबितांसमोर उभा राहिल्याने सरकारने त्यांना चतुर्थीपूर्वी आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता, असे गावकर म्हणाले.

सरकारने मात्र या खाण अवलंबितांच्या मागणीकडे कानाडोळा केला असून त्याला कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. चतुर्थी होताच आंदोलन छेडले जाईल. आंदोलनाच्या निर्णयावर आम्ही ठाम असल्याचेही गावकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील 88 खाण लिजांचे पर्यावरण दाखले सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2018 मध्ये रद्द केले होते. तेव्हापासून खाणी बंद असून अनेक खाण कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे.