Wed, May 27, 2020 05:45होमपेज › Goa › ‘मोस्ट वॉन्टेड’ अन्वर शेखच्या मुसक्या आवळल्या

‘मोस्ट वॉन्टेड’ अन्वर शेखच्या मुसक्या आवळल्या

Last Updated: Nov 20 2019 1:47AM
मडगाव : प्रतिनिधी 
दक्षिण गोव्यातील चार पोलिस स्थानकांत ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेला तसेच बलात्कार, खुनी हल्ला, मारहाण, खंडणी, अपहरण आणि दरोड्यांचा पंचवीसहून अधिक प्रकरणांचा सूत्रधार असलेला संशयित अन्वर शेख उर्फ टायगर अन्वर याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. 

दक्षिण गोव्यातील एका युवतीचे अपहरण करून धारवाड येथे तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार केल्याची तक्रार केपे पोलिस स्थानकात नोंद झाली होती. त्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांच्या खास पथकाने सौंदत्ती (कर्नाटक) येथील लॉजवर मंगळवारी पहाटे छापा टाकून अन्वर याला ताब्यात घेतलेे. त्याची कार पोलिसांनी ताब्यात घेतली असली तरी ती सौंदत्ती पोलिस स्थानकावर ठेवली आहे. 

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संशयित अन्वर शेख (मडगाव), तुळशीदास नाईक उर्फ तंबी (कुडचडे), राघवेंद्र देवर (मडगाव), शिवदत्त तलवार (सांत ईनेज) या चौघांनी एका युवतीचे अपहरण करून तिला धारवाड (कर्नाटक) येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार केपे पोलिस स्थानकात 15 नोव्हेंबर रोजी नोंद करण्यात आली होती. सदर युवतीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार मे 2019 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत तिला धारवाड येथील एका खोलीत डांबून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते.

या तक्रारीस अनुसरून दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी केप्याचे पोलिस उपअधीक्षक किरण पौडवाल यांच्या नेतृत्वाखाली केप्याचे पोलिस निरीक्षक संतोष देसाई, फातोर्ड्याचे पोलिस निरीक्षक कपिल नायक, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत बोरकर, पोलीस शिपाई संदेश गडकर, गोरखनाथ गावस यांचे पथक नियुक्त केले होते. सोमवारी या पथकाला अन्वर शेख हा कर्नाटकातील धारवाड येथे लपून बसल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष देसाई आणि कपिल नायक हे पोलिस पथकासह मंगळवारी धारवाडला रवाना झाले. पथक धारवाडच्या वाटेवर असताना त्यांना अन्वर तेथून निसटल्याची माहिती मिळाली.

तो धारवाड येथून थेट सौंदत्तीकडे पळाला होता. त्याने धारवाड सोडल्याची माहिती मिळताच गोवा पोलिसांचे पथक सौंदत्ती जवळ थांबले. पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्वर सौंदत्ती येथील एका लॉजवर थांबल्याचे पथकाला सूत्रांकडून समजल्यावर त्यांनी पहाटेच्या सुमारास थेट लॉजवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. अन्वर शेख याला ताब्यात घेऊन पोलिस सकाळी केपे पोलिस स्थानकावर दाखल झाले. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्वर याला बुधवारी (दि.20) रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकणात 16 नोव्हेंबर रोजी शिवदत्त तलवार याला ताब्यात घेतले होते. तर 18 नोव्हेंबर रोजी काणकोण रेल्वे स्थानकावरून रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले तुळशीदास राजू नाईक आणि राघवेंद्र देवर यांना काणकोण पोलिसांनी पकडून केपे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या सर्व संशयितांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी आहे.

पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार टायगर अन्वर हा कोलवा, मडगाव, फातोर्डा आणि कुडचडे या चार पोलीस स्थानकातील गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी आहे. सध्या त्याच्यावर केपे पोलिस स्थानकात बलात्कार आणि अपहरणाचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. खुनी हल्ला, दंगल माजवणे, मारहाण, बलात्कार, अपहरण, दरोडा, खंडणी उकळणे, चोरी, जीवे मारण्याची धमकी देणे यासारखे पंचवीसपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद आहेत. अन्वर याच्या विरोधात दक्षिण गोव्यातून त्याला तडीपार करण्यासंदर्भातील सुनावणी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर सुरू आहे. 2018 मध्ये मडगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत एकाला मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक कपिल नायक यांनी अन्वर शेख याला अटक केली होती. त्याची नंतर जामिनावर सुटका झाली होती. अधीक्षक गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर अन्वर पोलिसांचा ससेमिरा चुकवत फरारी झाला होता. युवतीच्या तक्रारीमुळे एका वर्षानंतर अन्वर पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात केप्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षदा देसाई पुढील तपास करत आहेत.

रंगेल स्वभावामुळे अडकला पोलिसी जाळ्यात!

अन्वर शेख याला त्याच्या रंगेल स्वभावासाठी ओळखले जाते. विवाहीत महिलांशी सलगी करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणे, त्यांना फूस लावून पळवून नेणे आणि लुबाडणे या त्याच्या स्वभावामुळे तो मंगळवारी पोलिसांच्या तावडीत सापडला. मंगळवारी तो सौंदत्ती येथील एका लॉजवर रासलिलेत गुंतला होता. त्याच लॉजखाली त्याची सीआरव्ही कार पार्क असल्याने तीच संधी साधून पोलिस निरीक्षक संतोष देसाई, कपिल नायक व पथकातील इतर पोलिसांनी सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या दोन पोलिसांना बरोबर घेऊन पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास लॉजला वेढा घातला. रासलीलेत मग्न असलेल्या अन्वरला आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे भान नव्हते. सुरुवातीला त्याने दार उघडले नाही, पण दार उघडत नसल्यास दरवाजा तोडून आत येऊ, असा दम पोलिसांनी दिल्यानंतर तो पोलिसांना शरण आला.