Wed, May 27, 2020 12:00होमपेज › Goa › मोन्सेरात, वाल्मिकी यांचे अर्ज दाखल

मोन्सेरात, वाल्मिकी यांचे अर्ज दाखल

Published On: Apr 27 2019 1:58AM | Last Updated: Apr 28 2019 1:06AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी काँग्रेसतर्फे बाबूश मोन्सेरात यांनी आणि आम आदमी पक्षातर्फे वाल्मिकी नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गोवा सुरक्षा मंचने प्रा. सुभाष वेलिंगकर यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपतर्फे उमेदवाराची घोषणा शुक्रवारी होऊ शकली नाही. शनिवारी उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

मोन्सेरात आणि वाल्मिकी नाईक यांनी पणजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निर्वाचन अधिकारी आर. मेनका यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले. मोन्सेरात यांना पाठिंबा देण्यासाठी 
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मोन्सेरात म्हणाले, पणजीत दोन कलमी कार्यक्रम राबवला जाणार असून यात रोजगार व विकास यावर भर दिला जाईल. येत्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पणजीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनीदेखील पक्षाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसोबत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. नाईक म्हणाले, पणजी पोटनिवडणुकीसाठी जाहीरनामा तयार केला जात आहे. यासाठी पणजीच्या नागरिकांची मते तसेच सूचना घेतल्या जात आहेत. वाहतूक, कचरा, पार्कींग आदी महत्वाच्या समस्यांनी पणजी शहर ग्रासले आहे. मात्र, या समस्या सोडवण्यात मागील अनेक वर्षांपासून अपयश आले असल्याची टीका त्यांनी केली.

मोन्सेरात यांनी पणजीची उमेदवारी दिल्याबाबत पक्षाचे आभार मानले. जनतेचा आपल्याला पाठींबा तसेच सहकार्य आहे. शहराच्या समस्या तसेच गरजा लक्षात घेऊन पणजीचा जाहीरनामा तयार केला जाईल. यात विशेष करुन रोजगार तसेच विकास हे दोन प्रमुख मुद्दे आहेत. रोजगार म्हणजे केवळ सरकारी नोकर्‍या नव्हे तर यात खासगी नोकर्‍यांचादेखील समावेश आहे. पणजीतील युवांना रोजगार उपलब्ध करण्यावर भर असेल, असे त्यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीत सर्व विरोधी उमेदवार आपल्यासाठी समान आहेत. प्रचाराला शहरात सुरुवात करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत जनतेने मोठ्या संख्येने मतदान केले त्याचप्रमाणे पणजी पोटनिवडणुकीतदेखील करावे, असे आवाहन मोन्सेरात यांनी केले.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनीदेखील यावेळी मोन्सेरात यांचा पणजी पोटनिवडणुकीत विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला. पणजीचा विकास हे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
पणजीच्या समस्या कोण सोडवेल असा प्रश्‍न केल्यास सरकारी यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवतात. मात्र ठोस असे आश्‍वासन कुणीच देत नाही. त्यामुळे पणजीची जबाबदारी घेण्यास आम आदमी पक्ष सज्ज बनला आहे. या समस्या सोडवण्याचे आम्ही केवळ आश्‍वासन देत नाही तर प्रत्यक्षात कृती करणार, असेही ‘आप’चे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले. 

भाजपचा उमेदवार आज जाहीर : तेंडुलकर

पणजी : प्रतिनिधी
भाजपचे केंद्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत उमेदवारी दाखल करण्याच्या कार्यक्रमात आणि ‘रोड शो’मध्ये व्यग्र असल्याने पणजी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार शुक्रवारी निश्‍चित  होऊ शकला नाही. शनिवारी (दि.27) सदर उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. 

तेंडुलकर म्हणाले की, पणजी भाजप कार्यकर्त्यांकडून सूचित केल्यानुसार पणजीसाठी उत्पल पर्रीकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर अशी दोन नावे गुरुवारी पाठवून देण्यात आली आहेत. मात्र, 
दिल्लीतील सर्व भाजप नेते वाराणसी येथील पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीला हजर राहिल्याने पणजी पोटनिवडणुकीचा भाजप उमेदवार शुक्रवारी जाहीर झाला नाही. आज उमेदवार जाहीर केला जाण्याची   शक्यता आहे.

उमेदवारी उशिराने जाहीर केल्याने प्रचाराला कमी वेळ मिळण्याची शक्यता नाही का, या प्रश्‍नावर ते म्हणाले की, भाजपचे दोन्ही संभाव्य उमेदवार हे पणजीतीलच असून पणजीवासीयांना परिचीत आहेत. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ते शहरातील घरोघरी फिरले आहेत. पणजी हा त्यामानाने लहान मतदारसंघ असून चार-पाच दिवसांत प्रचारात पिंजून काढता येतो. 
भाजपच्या विरोधात बाबूश मोन्सेरात आणि प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे आव्हान राहणार असले तरी याआधी मोन्सेरात यांना निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे. तर गोसुमंचा पणजीत फारसा प्रभाव जाणवत नाही. मात्र, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी भाजपला फारसा फरक पडत नाही. भाजपला पणजीवासीय पाठिंबा देणार असल्याचा विश्‍वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला. 

पणजीच्या समस्या सोडवणार : वेलिंगकर 
पणजी : प्रतिनिधी
पणजीत पार्किंग, कचरा, कॅसिनो, सांत इनेज खाडीची स्वच्छता, मलनिस्सारण व्यवस्था, पाणीपुरवठा आदी ज्वलंत समस्या असून गेली पंचवीस वर्षे भाजपच्या आमदाराला या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. स्थानिक म्हणून या समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य देणार आहे. आपल्याला भाजप व संघ कार्यकर्त्यांचाच नव्हे तर कॅथॉलिक, मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा मिळाला आहे. पणजी पोटनिवडणुकीत आपल्या रूपाने गोसुमंचा गोवा विधानसभेत प्रवेश होणार असल्याचा विश्‍वास  मंचचे उमेदवार प्रा.सुभाष वेलिंगकर यांनी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्‍तकेला. 
गोसुमंचे ज्येष्ठ नेते अरविंद भाटीकर यांनी पणजी पोटनिवडणुकीसाठी वेलिंगकर यांची उमेदवारी जाहीर केली.

मनोगत व्यक्‍तकरताना यावेळी वेलिंगकर म्हणाले की, पणजी शहरात दुर्दैवाने नेहमीच ‘सेटींग’ चे राजकारण झाले असून पणजी शहराची दुर्दशा झाली आहे. आपली जागा टिकवण्यासाठी काही राजकारण्यांनी पणजी, ताळगाव मतदारसंघाचा बळी घेतला आहे. पणजी ही आपली जन्मभूमी-कर्मभूमी असून या शहराच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. पणजीला स्मार्ट सिटी बनविण्याचे भाजपचे स्वप्न गेली अनेक वर्षे अपुरेच राहिले आहे. पणजीवासीयांना मुलभूत साधन सुविधा व सोयी पुरवण्यात भाजपला अपयश आले आहे. सेटींगचे हे राजकारण बंद होण्याची वेळ आली असून प्रामाणिक व तत्वनिष्ठ व्यक्तीने राजकारणात येण्याची गरज लक्षात घेऊन आपण उमेदवारी दाखल करणार आहे. सांत इनेज खाडीची स्वच्छता हा दर निवडणुकीतील जाहीरनाम्याचा भाग असला तरी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. पणजी ही गोव्याची राजधानी असून सेटींगचे राजकारण थांबवण्याचा स्पष्ट संदेश गोव्याच्या राजकारणात पोचवण्यासाठी गोसुमं सक्रिय झाले आहे. 

ताळगावचे माजी आमदार मोन्सेरात हे पणजी पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून त्यांच्यासोबत भाजप नेहमीच ‘फिक्सिंग’चे राजकारण करत आले आहे. असल्या खालच्या पातळीवरील राजकारणाचा पणजीवासीयांना कंटाळा आला असून त्यामुळेच भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य घसरले आहे. पणजी महानगरपालिकेवर मोन्सेरात यांचे अधिराज्य असून भाजप गटाकडून महापौर निवडणुकीसाठी तसेच ताळगाव पंचायतीसाठी साधे पॅनेलही उतरवले जात नाही, हे कशाचे लक्षण आहे ते पणजीकरांना माहीत आहे. ‘ग्रेटर पणजी’ सारखी संस्था फक्त राजकीय लाभासाठी आणि चरण्याचे वैयक्तीक कुरण म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता पणजीवासीयांना स्वच्छ प्रतिमेचा, प्रामाणिक आणि मूल्याधिष्ठीत राजकारण करणार्‍या व्यक्तीची गरज असून ही गरज गोसुमं भागवेल, असा विश्‍वास वेलिंगकर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी, किरण नायक, महेश म्हांब्रे, अ‍ॅड. स्वाती केरकर, खंवटे आदी मान्यवर होते.

‘पर्रीकरांविषयी सहानुभूतीचा भाजपला लाभ नाही’

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्याविषयी पणजीवासीयांच्या मनात नेहमीच आदर राहणार आहे. त्यांची कर्तव्यनिष्ठा, हुशारी, तत्परता, तडफदारपणाबद्दल सर्वांनाच आदर  आहे.  पण त्यांच्या निधनानंतर  भाजपविषयी सहानुभूती आता राहिलेली नाही. पर्रीकरांबाबत असलेल्या आदराचा लाभ भाजपला या निवडणुकीत होणार नाही. पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेला राज्यभरातून जनसागर लोटला असला तरी त्यांच्या अस्थिकलश विसर्जनावेळी आणि श्रद्धांजली सभेच्यावेळी काहीच गर्दी नव्हती. बांबोळीतील मोदींच्या सभेलाही गर्दी झाली नाही. पणजीचे हित कोणत्या गोष्टीत आहे, ते पाहून आता पणजीवासीय आपल्याला मतदान करतील.