Wed, May 27, 2020 12:37होमपेज › Goa › नोटाबंदी, जीएसटीच्या चुकीच्या कार्यवाहीमुळे आर्थिक मंदी

नोटाबंदी, जीएसटीच्या चुकीच्या कार्यवाहीमुळे आर्थिक मंदी

Published On: Sep 29 2019 1:20AM | Last Updated: Sep 29 2019 1:20AM

पणजी : दीपप्रज्वलनाने चर्चासत्राचे उद्घाटन करताना प्रा. गौरव वल्लभ. सोबत खेमलो सावंत, मनोज कामत, चेल्लाकुमार, गिरीश चोडणकर, बिना नाईक व प्रसन्न उटगी.पणजी : प्रतिनिधी

भारतातील आर्थिक मंदीचे दुष्परिणाम देशातील जनता  भोगत आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी व जीएसटी या दोन निर्णयांची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केल्याने भारताला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे, असे मत  काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी व्यक्त केले.

प्रदेश काँग्रेसतर्फे पणजीतील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित ‘भारताची सध्याची आर्थिकस्थिती’ या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून गौरव वल्लभ बोलत होते.  व्यासपीठावर त्यांच्यासमवेत प्रा. मनोज कामत, कामगार चळवळीचे नेते प्रसन्न उटगी, काँग्रेसचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर उपस्थित होते.

गौरव वल्लभ म्हणाले, जगभरातील देशांमध्ये राष्ट्रीय बँकांचे गर्व्हनर अर्थतज्ज्ञ आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मात्र  इतिहासतज्ज्ञ आहे. केंद्र सरकारने योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींची निवड केलेली नाही. हीच व्यक्ती  अर्थव्यवस्थेला धोकादायक  असे निर्णय घेत आहेत.  सरकारकडून घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयांना विरोधकांना जबाबदार ठरविले जात आहे.  सरकार अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याकडे दुर्लक्ष करीत असून राजकीय धोरणांना अधिक प्राधान्य देत आहे, अशी टिकाही त्यांनी केली. 

अर्थव्यवस्थेशी निगडित संस्थांमध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढत आहे. देशातील लाखो कंपन्या बंद पडत असून कामगार बेरोजगार झाले आहेत. यात पदवीधरांची संख्या अधिक आहे. या स्थितीतही केंद्र सरकार मात्र भारतीय अर्थव्यवस्था बळकट असल्याचा दावा करीत  आहे, असेही त्यांनी सांगितले. 

आरबीआयने फायद्यात चालणार्‍या पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध का लागू केले? आर्थिक निर्बंध घातल्यावर  तेथील संचालक मंडळावर कारवाई का झाली नाही? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात मौन धारण का केले आहे? असे प्रश्नही वल्लभ यांनी उपस्थित केले. यात केंद्राचा हस्तक्षेप आहे, असा  दावा प्रा. गौरव वल्लभ यांनी केला. 
प्रसन्न उटगी यांनीही नोटाबंदी व जीएसटी या केंद्राच्या निर्णयांमुळेच भारतीय अर्थव्यवस्था कमजोर झाल्याचे सांगितले. 

नोटाबंदी, जीएसटी, भ्रष्टाचार, गैरकारभारांमुळे भारताची अर्थव्यवस्था सध्या आयसीयूमध्ये आहे.  काही  वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जगात अव्वल होती. पण सध्या श्रीलंका, बांगलादेश यांसारखे आशिया खंडातील छोटे देश अर्थव्यवस्थेसंदर्भात भारताच्या पुढे आहेत. भारताच्या रुपयाचे मूल्य इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.  आरबीआयच्या गर्व्हनरांसकट मोठमोठे अर्थतज्ज्ञ सध्या भारतीय अर्थव्यवस्था कमजोर झाल्याचे मान्य करीत आहेत. पण सरकार मात्र ते मान्य करायला तयार नाही. 
-प्रा. मनोज कामत