Mon, May 25, 2020 02:47होमपेज › Goa › न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास वटहुकूमाचा पर्याय

न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास वटहुकूमाचा पर्याय

Published On: May 27 2018 1:18AM | Last Updated: May 27 2018 12:14AMपणजी : प्रतिनिधी

पुढील हंगामापासून खाण व्यवसाय पुन्हा सुरू होईल. खाणप्रश्‍नी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात आली आहे. खाणींबाबत न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास वटहुकूम जारी करणे हा पर्याय आमच्याकडे असेल, असे केंद्रीय आयुषमंत्री  श्रीपाद नाईक यांनी शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मंत्री नाईक म्हणाले की, राज्यातील खाणप्रश्‍न जलदगतीने सुटावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खाणींबाबत सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे न्यायालयातून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. राज्यातील खाण व्यावसायावर अनेक लोक अवलंबून असल्याने सरकार याविषयी सकारात्मक आहे. खाण व्यवसाय पुढील हंगामात पुन्हा सुरू होईल, असा विश्‍वास असल्याचेही त्यांनी म्हटले.

केंद्रातील भाजप सरकारने आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या चार वर्षांच्या कालावधीत  केंद्र सरकारकडून गोवा सरकारला  विविध विकासकामे हाती घेण्यासाठी जवळपास 30 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकार हे नेहमीच विकासाचे ध्येय बाळगून काम करीत आहे. चार वर्षांच्या कालावधीत   सरकारवर भ्रष्टाचाराचा  एकही आरोप झाला नाही. तर काँग्रेसच्या काळात रोज नवे घोटाळे समोर येत होते. आरोग्य व कृषी तसेच विविध क्षेत्रांसाठी अनेक योजना राबवून सर्वसामान्य  जनतेला सरकारने दिलासा दिला. यात उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत योजना, जीवनज्योती योजना, जनसुरक्षा योजना आदी योजनांचा यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे यासाठी योजना राबवण्याबरोबरच एससी व एसटी समाजाच्या विकासावरही सरकारने भर दिला आहे. याशिवाय केंद्र सरकार विकासाच्या बाबतीत गोव्याला प्रोत्साहन देत आहे. यात एमपीटीच्या विस्तारासाठी 15 कोटी रुपये, गोवा शिपयार्डला  30 कोटी रुपयांचे नवे काम, राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी 10 ते 12 हजार कोटी रुपयांबरोबरच एकूणच गोव्याला  30 हजार कोटी रुपये विविध विकासकामांसाठी मागील चार वर्षांत मंजूर करण्यात आल्याचेही मंत्री नाईक यांनी  सांगितले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर व  प्रदेश सरचिटणीस   सदानंद शेट तानावडे  उपस्थित होते.

यंदा ताळगावात जागतिक योग परिषद

यंदा जागतिक योग परिषद सप्टेंबर महिन्यात ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून उत्तर व दक्षिण गोव्यात उभारण्यात येणार्‍या आयुष इस्पितळांच्या कामास पुढील महिन्यापासून सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.