Thu, May 28, 2020 06:12होमपेज › Goa › खाण कामगारांनी थोडी कळ सोसावी 

खाण कामगारांनी थोडी कळ सोसावी 

Last Updated: Feb 07 2020 11:21PM
डिचोली  ः पुढारी वृत्तसेवा 

खाणीसंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 10 फेब्रुवारी रोजी महत्वपूर्ण सुनावणी होणार असून त्यात कोणता निर्णय लागतो ते बघूया व त्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल, त्यासाठी थोडे दिवस कळ सोसा, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सेसा वेदांता खाण कंपनीच्या कामगारांच्या शिष्टमंडळाला दिला. अजय प्रभुगावकर यांनी कामगारांची बाजू  सविस्तर  मांडली.   भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सेसा वेदांता कामगारांनी  शुक्रवारी डिचोलीत बैठक घेऊन  कंपनी व सरकार  कामगारांचे हित जपत नाहीत, अशी चिंता व्यक्त केल्यानंतर सभापती राजेश पाटणेकर व आमदार प्रवीण  झांट्ये यांनी सेसा कामगारांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित केली होती. पणजी विधानसभा संकुलात आयोजित केलेल्या  बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कामगारांच्या व्यथा समजून घेऊन सरकार तोडग्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांना थोडे दिवस कळ सोसा, असे आवाहन केले. खाण व्यवसाय सुरु करण्याबाबत जर उशीर होत असेल तर   खाण महामंडळ स्थापन  करण्यासह पर्याय खुले ठेवलेले असून त्यासाठी संपूर्ण मसुदा  तयार करण्याची प्रक्रिया सरकारने खुली ठेवली  आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. त्यामुळे थोडा धीर धरा, सरकार आपल्या परीने स्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून कामगारांचे व खाण अवलंबितांचे भाजप सरकारने सदैव हित जपलेले असून आताही सर्व काही सुरळीत होईल,   असे मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी   शिष्टमंडळाला   सांगितले.  

सेसा कामगारांना अर्धाच पगार मिळत असून त्यामुळे कामगार आर्थिक संकटात आहेत हा विषय  अजय प्रभुगावकर नीलेश कारबोटकर,किशोर  लोकरे यांनी मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या समोर उपस्थित केला असता पूर्ण पगाराबाबत आपण वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे डॉ सावंत यांनी सांगितले. सभापती राजेश पाटणेकर,आमदार  प्रवीण झांट्ये यांनी कामगारांचा प्रश्न सोडवून त्यांना पूर्ण पगार तसेच त्यांच्या इतर  मागण्यांचा पाठपुरावा करून कामगारांना  दिलासा द्यावा,अशी विनंती मुख्यमंत्री सावंत यांना केली. 

आंदोलन तात्पुरते  स्थगित 

दरम्यान, सेसा कामगारांनी सोमवार पासून आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. मात्र  शुक्रवारी सायंकाळी सभापती व आमदार यांनी मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्याशी कामगार संघटनेची चर्चा व बैठक घडवून आणल्याने व मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी  समस्या सोडवण्याची पूर्ण  हमी दिल्याने  कामगारांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती कामगार नेते निलेश कारबोटकर यांनी दिली.