Wed, Jul 08, 2020 12:36होमपेज › Goa › ई-लिलाव होऊनही खनिजमाल पडून 

ई-लिलाव होऊनही खनिजमाल पडून 

Published On: Sep 11 2019 2:29AM | Last Updated: Sep 10 2019 10:24PM
मडगाव : प्रतिनिधी
खनिज मालाचा लिलाव होऊन महिना उलटला तरी खनिज वाहतूक सुरू न झाल्याने ट्रक मालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दक्षिण गोव्यातील खाण कंपन्यांनी केपे, सांगे आणि धारबंदोडा तालुक्यात  ई- लिलावाचा पाच दशलक्ष टन खनिजमाल खरेदी करून ठेवला आहे. पण अजून त्यांना वाहतुकीसाठी परवानगी न मिळल्यामुळे यंदाचा मोसमही वाया जाईल, अशी भीती खाण अवलंबित ट्रक मालकांमध्ये पसरली आहे.

मे महिन्याच्या शेवट पर्यंत तारकर आणि मॅग्नम या सांगे तालुक्यातील दोन खाणींवरील खनिज वाहतूक सुरू होती.त्यमुळे हजारो ट्रकांना काम मिळाले होते.ऑगस्ट महिन्यांत तब्बल सतरा महिन्यांच्या खंडानंतर सरकारने पाच दशलक्ष टन खनिज मालाचा लिलाव केला होता.अजून लिलाव झालेला माल उचलण्यासाठी आवश्यक परवाने न मिळाल्याने हा माल तसाच पडून आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार 

फेब्रुवारी 2018 मध्ये राज्यातील खाण उद्योग  बंद पडला होता. सरकार कडून खाण व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश मिळेपर्यंत राज्यातील खाण व्यवसाय सुरू होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने खाण अवलंबित ट्रक मालकांची मदार ई लिलावाच्या खनिज वाहतुकीवर आहे. गेल्या मोसमात चार महिने खनिज वाहतूक सुरू होती त्यामुळे लोकांना थोडा फार दिलासा मिळाला होता.सध्या सांगे,केपे आणि कुडचडे भागात ट्रक मालकांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. खनिज व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असताना ज्या लोकांनी खनिज वाहतुकीसाठी ट्रक खरेदी केले होते त्यांचे हप्‍ते अजून फेडण्यात आलेले नाहीत.अनेकांनी तोटा सहन करून आपल्या ट्रकांची परराज्यात विक्री केली असून अनेकांचे ट्रक फायनान्स कंपन्यांनी जप्त केले आहेत.लोकांनी ’घरातील दागिने आणि जमिनी गहाण ठेऊन कर्जे भरलेली असून ‘ऋण काढून सण’ साजरा करण्याची वेळ खाण अवलंबित लोकांवर आलेली आहे.

एमपीटी मधून होणार्‍या कोळसा आणि खडी वाहतुकीचा ट्रकमालकांना आधार होता, पण तिथेही ट्रक स्थानिकांचे की बाहेरचे असा वाद निर्माण झाल्याने सर्व लोकांना त्याठिकाणी काम मिळेनासे झाले आहे.सविस्तर माहितीनुसार वास्को येथील स्थानिक ट्रक मालकांना कोळसा आणि खडी भरण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याने त्या ठिकाणी खाण व्याप्त भागातील ट्रकांना काम उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे. 

नगरसेवक फेलिक्स फर्नांडिस यांनी सांगितले,की  सध्या ट्रकाना काम मिळत नसल्याने कोणताही भेदभाव न करता सर्वाना समावून घेणे अवश्यक आहे. एमपीटी वास्कोत आहे, त्यामुळे वास्कोतील लोकांना प्राधान्य दिले जात असले तरी कोळशाची आणि खडीची वाहतूक कुडचडे आणि सावर्डे मार्गे होत आहे.आणि त्या वाहतुकीचा त्रास या भागातील लोकांना होत असल्याने खाण भागातील ट्रक मालकांना सुद्धा एमपीटीत प्राधान्य दिले जावे, असे ते म्हणाले.

रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम बंद आहे. धडे, सावर्डे, शेवळवण, कुडचडे या भागातील ट्रकांना माती आणि खडीच्या वाहतुकीसाठी काम मिळाले होते.आता रेल्वेच्या दुपदरी करणासाठी रेल्वेला जमीन उपलब्ध होत नसल्याने दुपदरीकरणाचे कामही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दक्षिण गोवा प्रोग्रेसिव्ह ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राऊत देसाई यांनी सांगितले,की  खनिज वाहतूक सुरू करण्याबाबत सरकार कडे चर्चा केली जाणार आहे.धारबंदोडा तालुक्यातील काही खाणीवर मोठया प्रमाणात खनिज माल पडून आहे.या खनिजाची वाहतूक सुरू झाल्यास ट्रक मालकांना दोन वर्षे तरी काम मिळेल.मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.