Mon, May 25, 2020 04:52होमपेज › Goa › मंत्री डिसोझा-लोबो वाद तूर्त संपुष्टात

मंत्री डिसोझा-लोबो वाद तूर्त संपुष्टात

Published On: Jun 29 2018 12:07AM | Last Updated: Jun 29 2018 12:02AMपणजी : प्रतिनिधी

ज्येष्ठ भाजप नेते तथा नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि कळंगुटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांचा वाद तूर्त मिटला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या दोन्ही नेत्यांमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी यशस्वी शिष्टाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेले काही दिवस मंत्री डिसोझा आणि आमदार लोबो यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पेटले होते. यासंबंधी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोन्ही नेत्यांना तसेच भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे यांना गुरुवारी दुपारी भेटण्यास बोलावले. या बैठकीत हा वाद आणखी न वाढवता तो मिटवण्याचा आणि काहीही समस्या असल्यास आपल्यासमोर आणण्याचे पर्रीकर यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर वाद मिटल्याचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि  उपसभापती मायकल लोबो दोघांनीही सांगितले. पत्रकारांशी बोलताना लोबो म्हणाले की, आपले मंत्री डिसोझा यांच्याशी वैयक्‍तिक काहीही मतभेद नाहीत. आपण फक्‍त उत्तर गोव्यातील आणि  विशेषतः  म्हापसा शहरातील लोकांच्या मनातले तेच बोललो. मात्र, समाजकारणात सर्व टीका सकारात्मकरीत्या घेणे आवश्यक आहे. आपल्यावरही अनेकजण टीका करत असले तरी ते आपण सकारात्मकपणे  घेत असल्याने आपल्याला त्रास होत नाही. मुख्यमंत्र्यांनी आपापसात वाद करणे चुकीचे असल्याचे पटवून दिले.   कदाचित वय झाल्यामुळे डिसोझा यांना राग सहन न होऊन ते काहीतरी बोलले असावेत. मात्र, आपण मंत्री डिसोझा यांचा नेहमीच आदर करत आलो आहे.

पर्रीकर यांनी आम्हा दोघांनाही यापुढे काहीही टिप्पणी न करण्याचे  सांगून ते अन्य महत्त्वाच्या कामासाठी निघून गेले. मात्र, आपल्याविरुद्ध  लोबोंनी तोंड बंद ठेवले तर प्रत्युत्तर देण्याची आपल्याला गरज पडणार नाही. मात्र, त्यांनी पुन्हा टीका केल्यास आपल्यालाही प्रत्युत्तर देणे भाग पडेल, असे मंत्री डिसोझा यांनी सांगितले.