Tue, May 26, 2020 05:01होमपेज › Goa › म्हादई अभयारण्यात ‘व्याघ्र क्षेत्र’ जाहीर करणार : मुख्यमंत्री सावंत

म्हादई अभयारण्यात ‘व्याघ्र क्षेत्र’ जाहीर करणार : मुख्यमंत्री सावंत

Last Updated: Jan 10 2020 12:46AM

मुख्यमंत्री प्रमोद सावंतपणजी : प्रतिनिधी

वाघ ही राष्ट्राची संपत्ती असून ही संपत्ती नष्ट करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देऊन  वाघांच्या संरक्षणासाठी म्हादई अभयारण्यातील जंगलाचा काही भाग ‘व्याघ्र क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले.  यासाठी या जंगलातील अतिदुर्गम भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.  

पर्वरी येथील विधानसभा संकुलाच्या सभागृहात विधिकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते.  ते म्हणाले, की सत्तरी तालुक्यातील गोळावली येथे रविवारी एका वाघाचा मृतदेह सापडला, त्यावेळी आपण खूप दु:खी झालो. याचवेळी या जंगलातील अन्य वाघांच्या सुरक्षितेबाबत आपल्या मनात पाल चुकचुकली होती. ही शंका खरी ठरली आहे. राज्यात चार वाघांचा दारूण मृत्यू व्हावा, हे आमचे दुर्भाग्य आहे. या घटनेची राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली असून यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली जाणार आहे.

 राष्ट्राची संपत्ती असलेल्या वाघांचे संरक्षण करण्यासाठी या जंगलातील भाग व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर केले जाणार आहे. या जंगलात अत्यंत दुर्गम भागात दोन कुटुंबे राहत असून अन्य 5-6 ठिकाणी काही कुटुंबेही वास्तव करून असल्याचे आढळून आले आहे.या कुटुंबांच्या जिवालाही धोका असल्याने त्यांचे दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर करण्याचा आदेश आपण वन आणि महसूल खात्याला   दिला असून त्यांना घर व अन्य सर्व साधनसुविधा सरकारकडून पुरवल्या जाणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

जंगलात वाघाकडून गोठ्यातील गायी, म्हशी मारल्या गेल्या तर यापुढे त्याचवेळी दखल घेतली जाणार आहे. स्थानिक गावकर्‍यांना अशी जनावरे मारली गेली तर तत्काळ नुकसानभरपाईही देण्याचे व त्यांना मदत करण्याचे आदेश आपण मुख्य वनपालांना दिले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणआले, की मृत झालेल्या वाघांचा ‘व्हिसेरा’ पुढील तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात आला आहे. त्यासंंबधी अहवालानंतरच वाघांच्या मृत्यूचे नेमके कारण समजून येणार आहे. मात्र, या प्रकरणी गुन्हेगार सुटणार नाही याची ग्वाही आपण देत आहे. वाघ ही राष्ट्राची आणि राज्याचीही संपत्ती असून ती सांभाळण्याची  व त्यांना संरक्षण पुरवण्याची सरकारचीच नव्हे तर आमच्या सर्वांचीच जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री सांवत यांनी सांगितले. 

चौकशीसाठी द्विसदस्यीय पथक

गोळावली येथे चार वाघांच्या मृत्यूची घटना केंद्र सरकारनेही गांभीर्याने घेतली आहे. यासंबंधी केंद्रीय वन व पर्यावरण मत्रांलयाचे महा -उपनिरीक्षक निशांत वर्मा यांनी राज्य सरकारला बुधवारी रात्री खास पत्र  पाठवले आहे. मंत्रालयामार्फत वाघांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी  बंगळूर राज्याचे सहायक वन निरीक्षक राजेंद्र गरवाड आणि पश्‍चिम विभाग, मुंबईचे वन उपसंचालक या दोन अधिकार्‍यांचे खास पथक नेमण्यात आले आहे. वाघांचा मृत्यू झाल्यानंतर गोवा राज्याच्या वन अधिकार्‍यांकडून काय पावले टाकण्यात आली, मृत वाघांच्या मृतदेहांची विल्हेवाट शास्त्रीयरित्या करण्यात आली का, याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, वन्यजीव संरक्षण कायदा-1972 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याबाबत या पथकाने राज्य सरकारला मार्गदर्शन करावेे आणि वाघ मृत्यू प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात अहवाल मंत्रालयाला पाठवावा, असे सांगण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.