Thu, May 28, 2020 19:37होमपेज › Goa › म्हादईप्रश्नी दोन दिवसांत मंत्री जावडेकरांचे उत्तर

म्हादईप्रश्नी दोन दिवसांत मंत्री जावडेकरांचे उत्तर

Last Updated: Nov 15 2019 11:22PM
पणजी : प्रतिनिधी
म्हादई प्रश्नावर आपण केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे. दोन दिवसांत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या समितीची बैठक घेऊन त्यात जो काही निर्णय होईल, ते राज्याला कळवण्यात येणार असल्याचे त्यांनी कळविल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. 
येथील एका कार्यक्रमात आलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी केंद्रीय वनमंत्री जावडेकर यांनी म्हादई प्रश्नाबाबत 10 दिवसांत उत्तर देणार असल्याचे सांगितले असून ही मुदत संपली तरी उत्तर न आल्याबद्दल विचारणा केली असता ते बोलत होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, अशा विषयात दहा दिवस असे शब्दश: मोजायचे नसतात, याचे भान लोकांनी ठेवावे. गुरूवारीच दहा दिवस पूर्ण झाले आहेत. आपण स्वत: जावडेकर यांच्याशी शुक्रवारी सकाळी संपर्क साधला आहे. त्यावर जावडेकर यांनी मंत्रालयाच्या समितीची बैठक होणे बाकी असून येत्या दोन दिवसांत दिल्लीहून काय तो निर्णय कळवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे बोलणी सुरू असून आम्हाला अनुकूल, सकारात्मक निर्णय मिळेल, असा आपल्याला विश्वास आहे. 
म्हादई नदीच्या पाणीवाटपावरून गोवा व कर्नाटक राज्यांमध्ये वाद आहे. कळसा-भांडुरा जल प्रकल्पाला अलीकडेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण परवाना दिला असल्याचे जावडेकर यांनी ट्विटरवर जाहीर केल्यावर राज्यभर खळबळ माजली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली 4 नोव्हेंबरला दिल्लीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले होते. शिष्टमंडळाने मंत्री जावडेकर यांना कर्नाटकाला दिलेले पत्र मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावेळी जावडेकर यांनी 10 दिवसांत या पत्रावर निर्णय कळवणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते.