Thu, May 28, 2020 06:33होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी विधानसभेत सरकारला घेरणार : आमदार रेजिनाल्ड

म्हादईप्रश्‍नी विधानसभेत सरकारला घेरणार : आमदार रेजिनाल्ड

Published On: Jan 31 2018 12:16AM | Last Updated: Jan 30 2018 11:54PMपणजी: प्रतिनिधी

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकाकडून  कळसा कालव्याचे बांधकाम केले जात आहे. हे  माहिती असून देखील कुठलीच कारवाई सरकारने केलेली नाही. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  म्हादईप्रश्‍नी   सरकारला  विधानसभेत काँग्रेसकडून घेरले जाईल,असे सांगून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा,अशी मागणी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली. या संदर्भात काँग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत   निर्णय घेतला जाणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

रेजिनाल्ड म्हणाले, म्हादईचे पाणी आपल्याकडे वळवण्यासाठी कर्नाटककडून  कालव्याचे काम हाती घेण्यात आले.या कामाची कल्पना जलस्त्रोत खात्याने  तसेच तत्कालीन जलस्त्रोत   मंत्र्यांनी    तत्कालीन  सरकारला दिली होती. मात्र असे असून देखील सरकारने  या बेकायदेशीर कृतीच्या विरोधात काहीच कारवाई केली नाही. उलट  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष  बी.एस येडियुरप्पा यांना पत्र पाठवून  म्हादई प्रश्‍नी व्दिपक्षीय चर्चेची तयारी दर्शवली. पर्रीकर यांना येडियुरप्पा यांना पत्र पाठवण्याचा अधिकार कोणी दिला,अशी विचारणा करून  पर्रीकर यांनी  मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,असेही रेजिनाल्ड म्हणाले.

 काँग्रेस नेते अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले,  म्हादई प्रश्‍नी सर्व गोमंतकीयांनी  तसेच राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.  कर्नाटक कडून म्हादईचे पाणी वळण्यासाठी  बंधार्‍याबरोबरच   सुमारे 10 मीटर खोल   कालव्याचे  बांधकाम  केले जात  आहे. ही गंभीर बाब असून त्या विरोधात गोवा सरकारने   दंड थोपटणे आवश्यक  होते.  कर्नाटकाने हाती घेतलेल्या या कामांमुळे गोव्यातील नदी , नाले आटणार,अशी शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात गोव्यात पाणी टंचाईचा प्रश्‍न उद्भवण्याची भीती आहे.  परंतु सत्ताधारी पक्ष मात्र गप्प  असून   कर्नाटकाच्या कामाकडे डोळेझाक करीत आहे.  पर्रीकर यांनी  आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा.

 कर्नाटकाकडून   हाती घेण्यात आलेले कळसा कालव्याचे काम म्हणजे न्यायालयाच्या निर्देशांचे उल्‍लंघन असल्याने म्हादई बचाव अभियानतर्फे सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली जाणार आहे.  काँग्रेस पक्षाचा  अभियानला पूर्ण पाठिंबा असल्याचेही अ‍ॅड.खलप यांनी सांगितले.