Wed, May 27, 2020 18:46होमपेज › Goa › दूध पाकिटांवर मतदानाचा संदेश

दूध पाकिटांवर मतदानाचा संदेश

Published On: Apr 16 2019 2:16AM | Last Updated: Apr 16 2019 12:37AM
पणजी : प्रतिनिधी

मुख्य निवडणूक अधिकारी  कार्यालयाकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दूध पाकिटांवर निवडणूक लोगोसह मतदान करा, असे नमूद करण्यात आलेला संदेश मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.

गोव्यात 23 एप्रिल रोजी  लोकसभा तसेच मांद्रे, शिरोडा व म्हापसा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये  पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या  पार्श्‍वभूमीवर  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या उपक्रमाची सुरुवात 13 एप्रिल रोजी करण्यात आली. गोवा डेअरीच्या दूध पाकिटांवर 23 एप्रिल रोजी मतदान करा, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदानाचे महत्त्व पटवणे तसेच मतदानाच्या हक्‍काविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले.

दुधाचा वापर हा प्रत्येक  घरांघरांमध्ये केला जातो. त्यातही गोवा डेअरी दूध पाकिटांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात राज्याच्या प्रत्येक गावामध्ये तसेच शहरात होत असल्याने अशा प्रकारे संदेश मतदारांमध्ये सहज पोचवणे शक्य होत  असल्याने या उपक्रमासाठी गोवा डेअरी दूध पाकिटांचा वापर केला जात असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून  सांगण्यात आले. 

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या स्वीप मोहिमेअंतर्गत  हा उपक्रम राबवला जात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांच्या हस्ते त्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी अतिरीक्‍त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत, संयुक्‍त मुख्य निवडणूक अधिकारी देविदास गावकर, तियात्र अकादमीचे गुरुदास पिळर्णकर व अधिकारी  गेरवासिओ मेंडीस व जॉन आगियार उपस्थित होते.