Wed, May 27, 2020 03:56होमपेज › Goa › दसर्‍यानंतर मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचे वाटप

दसर्‍यानंतर मुख्यमंत्र्यांकडील खात्यांचे वाटप

Published On: Oct 13 2018 1:15AM | Last Updated: Oct 13 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकर हेच कायम राहणार असून   ‘एम्स’मधूनच ते राज्याचा कारभार चालवणार आहेत. आपल्याकडील प्रमुख खाती कोणालाही देणार नसून   कमी महत्त्वाच्या खात्यांचे वाटप दसर्‍यानंतर केले जाणार असल्याचे सहकारी मंत्री व गाभा समितीशी दिल्लीत शुक्रवारी (दि.12) मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या चर्चेनंतर स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पर्रीकर दिवाळीला राज्यात परतणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी भाजप  गाभा समितीतील केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद तानावडे आणि खजिनदार संजीव देसाई यांच्याशी  सकाळी 10 वाजता बैठक घेतली. 

या बैठकीनंतर आयुषमंत्री नाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्याचे प्रशासन कसे चालत आहे, ते आणखी जलदरीतीने काम कसे करेल, यावर मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. पर्रीकर यांची प्रकृती सुधारत असून त्यांनी आपण दिवाळीला राज्यात परतणार असल्याचे आमच्याशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांकडील खात्यांच्या वाटपाबाबत चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री बदलण्याबाबत कोणताही प्रस्ताव शुक्रवारच्या बैठकीत आला नसून मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकर हेच कायम राहणार आहेत.

गाभा समितीशी चर्चेनंतर भाजपचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वीज मंत्री नीलेश काब्राल आणि नगरविकास मंत्री मिलींद नाईक  हे चार मंत्री आणि घटक पक्षाच्या दोन मंत्र्यांशी पर्रीकर यांनी ‘वन टू वन’ चर्चा केली. यावेळी  खाते वाटपाबाबतचे प्रत्येकाचे मत त्यांनी जाणून घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले.     

पर्रीकर यांना भेटून आल्यानंतर नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राज्यातील घटक पक्षांचे भाजपप्रणीत सरकार स्थिर रहावे, असे विचार मांडले. त्यावर घटक पक्षांच्यावतीने आपण आणि ढवळीकर यांनी सरकार स्थिर राहणार असून भविष्यातही ते स्थिरच राहणार असल्याची ग्वाही दिली. पर्रीकर यांनी आपल्याजवळील काही खाती सहकारी मंत्र्यांना देण्याबाबत आमचे मत जाणून घेतले. आपण दसर्‍यानंतर खाती वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीला पर्रीकर यांना ‘एम्स’मधून डिस्चार्ज मिळणार असून ते राज्यात परतणार आहेत. 

भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर म्हणाले की, राज्यात बंद पडलेल्या खाणी येत्या महिनाभरात  सुरू व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री पर्रीकर पुन्हा केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. येणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांच्या दसर्‍यानंतर सभा घेण्याची सूचना पर्रीकर यांनी केली. 

खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार : ढवळीकर 

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राज्याचा विकासकामांबाबत आणि प्रशासन व्यवस्थेबाबत चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही चर्चा झाली. लोकसभेच्या आचारसंहिता लागू होण्याआधी विकासकामे जलदरीत्या पूर्ण करण्याचा आदेश पर्रीकरांनी दिला आहे. खातेवाटपाबाबतचा अधिकार हा पर्रीकरांचाच असून  मुख्यमंत्री जो काही निर्णय देणार आणि जी खाती आम्हाला देतील ती आम्हाला मान्य असतील. 

सरकार कोसळल्याचे सिद्ध : चोडणकर 

  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिल्लीत ‘एम्स’मध्ये घेतलेली मंत्र्यांची बैठक म्हणजे राजकीय नाटक असून गोमंतकीयांना आपले सरकार अस्तित्वात असल्याचा देखावा तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारवर सध्या सर्व स्तरांतून टीका होत असून मुख्यमंत्री दिल्लीत इस्पितळात राहिल्याने प्रशासन कोलमडलेले आहे. एका इस्पितळात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन सरकार कोसळले असल्याचे सिद्ध झाले आहे. मंत्र्यांना आता दिल्लीत इस्पितळात किती काळ बैठकीसाठी जावे लागेल, हे माहिती नाही. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गोमंतकीय जनतेच्या भावना ओळखून काँग्रेस पक्षाला विधानसभेत आपली ताकद दाखवण्याची संधी द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा करत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.