Thu, May 28, 2020 07:28होमपेज › Goa › मांद्य्रातील लढत उत्कंठेची

मांद्य्रातील लढत उत्कंठेची

Published On: Apr 03 2019 1:44AM | Last Updated: Apr 03 2019 12:15AM
पेडणे ः भावार्थ मांद्रेकर   

गोवा विधानसभेच्या मांद्रे मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत सर्व उमेेेदवारांनी आपापला प्रचार कसून सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित होण्यास उशीर झाला,तोवर भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे व अपक्ष उमेदवार जीत आरोलकर  यांनी    प्रचार सुरूही केला आहे. दि 2 एप्रिल रोजी बाबी बागकर यांची उमेदवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जाहीर केल्याने मांद्रेची लढत सोपटे, आरोलकर आणि बागकर  यांच्यात  रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, काँग्रेसचे तिकीट नाकारलेले रमाकांत खलप, सचिन परब यांच्यासोबत अन्य नेते व कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यात जो उमेदवार यशस्वी होईल, त्याचे पारडे जड असेल, असेच राजकीय चित्र सध्या येथे आकार घेत आहे. त्यात सायलंट मतदारांचा कौलसुद्धा या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे मांद्रेची जनता सत्तेच्या मागे राहते, की सत्तेविरुद्ध मतदान करते हे पाहणे उत्कंठावर्धक ठरणार आहे.

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या या मतदारसंघात सोपटेंनी मागील निवडणुकीत त्यास सुरुंग लावला होता. सध्या तेच सोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात आल्याने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे पक्षापेक्षा येणार्‍या निवडणुकीत व्यक्तीकेंद्रितच   मतदान होण्याची शक्यता आहे. त्यात दयानंद सोपटेना पक्षांतराचा लाभ होईल, की हा निर्णय अंगलट येईल? बाबी बागकर यांना जनता साथ देईल, की युवा नेते जीत आरोलकर  या राजकीय खिचडीचा लाभ घेतील ,याचा  निर्णय लोकांच्या हातात आहे. 

दर निवडणुकीप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवार निवडीचे घोंगडे यावेळीही भिजतच पडलेले होते. बाबी बागकर, रमाकांत खलप की सचिन परब या तीनपैकी एका नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. खलप यांना  या मतदारसंघातून पाचवेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून दिले आहे. सचिन परब यांचा मतदारसंघात दांडगा संपर्क आहे.त्यात  बाबी बागकर यांची पक्षनिष्ठा पाहून त्यांना यावेळी उमेदवारी  जाहीर झाली. पण अंतरिम माहितीप्रमाणे ही उमेदवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यालाच मिळणार, असे संकेत होते.पण शेवटच्या क्षणी बागकर यांच्यावर पक्षाने भिस्त सोपवली. काँग्रेसचा उमेदवार उशिराने निश्चित झाल्याने  दरवेळीप्रमाणे त्यांच्या सुशेगाद वृत्तीमुळे  काँग्रेसचे वारू रुळावर यायला वेळ जाईल.  काँग्रेसच्या उमेदवार ठरवण्याच्या धामधुमीत विरोधी उमेदवारांनी प्रचारात गती घेतली आहे. त्यामुळे पुढील वीस दिवसात बाबी बागकर यांना युद्धपातळीवर प्रचारकार्य करावे लागेल.

इच्छुक काँग्रेस उमेदवारांपैकी ज्यांना तिकीट नाकारले गेलेय त्यांच्याशी विरोधकांनी आतापासूनच बोलणी चालवल्याची चर्चा असल्याने जो उमेदवार या नाराज नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी होईल, त्याला ही निवडणूक जिंकण्याची अधिक संधी आहे,अशीही चर्चा आहे.  

सोपटेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची आणि निर्णायक ठरणार आहे. ही लढत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला निर्णायक वळण देणारी, किंवा राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम देणारी असेल. दयानंद  सोपटे हे 2017 विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून या भागाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मोठया  फरकाने पराभूत करून जायंट किलर ठरले होते. पण पुढील  दोन वर्षांनी  त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्याने येथे पोट निवडणूक लादली गेली.

मांद्रे मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांची अंतर्गत भूमिका काय असणार,  हे महत्वाचे ठरणार आहे.  दुखावलेले पार्सेकर आपली पक्षनिष्ठा राखून भाजपाच्या प्रचारात उतरतील, की आपला वैयक्तिक प्रतिस्पर्धी सोपटे यांच्या विरोधात काम करतील? या नेत्यांची निवडणुकीच्या अंतिम वेळी नेमकी रणनीती काय असणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

विधानसभेच्या 2017 निवडणुकीत लक्ष्मीकांत पार्सेकर यांना 7119 मतांच्या मोठ्या फरकाने दयानंद सोपटे यांनी पराजित केले.  काँग्रेसला राज्यात सत्ता प्रस्थापित करणे शक्य न झाल्याने जायंट किलर सोपटेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. त्यांना गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले गेले. तसेच मांद्रेतील रखडलेली विकासकामे झपाट्याने मार्गी लावून  पोट निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्यासाठी भक्कम पाया घातला. सोपटे हे मूळ भाजपाचेच. पेडणे मतदारसंघाचे माजी आमदार, जिल्हा पंचायत सदस्य होते. सध्या राज्यात भाजपचे सरकार असल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी लोक  पोटनिवडणुकीत पुन्हा निवडून आणतील, असा सोपटेनी दावा केला आहे. आपण भाजपात प्रवेश केल्याने आपल्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांसोबत  नवे कार्यकर्ते जोडले गेल्याने आपला विजय निश्चित असल्याचे ते म्हणतात. 

सोपटे की काँग्रेस याची चर्चा सुरू असताना युवा नेता जीत आरोलकर याने गेल्या वर्षभरात मांद्रे मतदारसंघात आपले काम सुरू केले आहे.सध्या प्रचारातही चांगलीच गती घेतल्याचे लक्षात येते.  महाराष्ट्र वादी गोमंतक पक्ष आणि आम आदमी पक्षांच्या नेत्यांनी आरोलकर यांना उघड पाठिंबा दिला आहे. ख्रिश्‍चन मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काना मागून आला अन तिखट झाला, अशी स्थिती जीत आरोलकरामुळे मतदारसंघातील प्रस्थापितावर येऊ नये म्हणजे मिळवले. 

मांद्रे मतदारसंघ 2017 विधानसभा बलाबल
पक्ष    उमेदवार    मतदान
काँग्रेस    दयानंद सोपटे    16490
भाजपा    लक्ष्मीकांत पार्सेकर    9371
मगो    श्रीधर मांद्रेकर    678
आप    देवेंद्र देसाई    620
राष्ट्रवादी    राजेंद्र साटेलकर    234
अपक्ष    संजय देसाई    101
बामसेफ    भीम पेडणेकर    57
नोटा        415
एकूण मतदान    27966
एकूण मतदाते    32678

मांद्रे मतदारसंघाचे आजवरचे आमदार
1962    दयानंद बांदोडकर, मगो
1967    अंथॉनी डिसोझा, मगो
1972    बी.बी,बालकृष्णा, मगो
1977, 80, 84, 89 आणि 1999   रमाकांत खलप, मगो
1994    संगीता परब, काँग्रेस
2002, 2007, 2012    प्रा लक्ष्मीकांत पार्सेकर
2017    दयानंद सोपटे, काँग्रेस