Wed, May 27, 2020 04:24होमपेज › Goa › सात दिवसांत कांदा स्वस्तात उपलब्ध करा, अन्यथा आंदोेलन

सात दिवसांत कांदा स्वस्तात उपलब्ध करा, अन्यथा आंदोेलन

Last Updated: Nov 30 2019 1:45AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई वाढत चाललेली असून कांद्याचा भाव गगनाला भिडलेला आहे. महाग दरात कांदा विकत घेऊन घरसंसार चालविणे गृहिणींच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे. सरकारने पुढील 7 दिवसांत लोकांना कांदा स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावा, अन्यथा प्रदेश महिला काँग्रेसतर्फे राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला .

राज्यात यापूर्वी नारळाचे दर वाढले होते. त्यावेळी महिला काँग्रेसने पेडणेपासून काणकोणच्या टोकापर्यंत तसेच मुरगावपासून सांगेपर्यंत नारळ आंदोलन छेडून लोकांना स्वस्त दरात नारळ उपलब्ध करून दिले होते. सरकारला फलोत्पादनाच्या गाळ्यांवर सवलतीने नारळ विक्री करण्यास भाग पाडले होते. महिला काँग्रेसतर्फे कांदा दरवाढीच्या मुद्यावरून आंदोलन छेडण्यापूर्वी सरकारने फलोत्पादनाच्या गाळ्यांवर लोकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन द्यावा. सरकारने प्रती किलो 20 रुपये लोकांना कांदा द्यावा व सरकारने शंभर रुपयांची कळ सोसावी, अशी मागणीही कुतिन्हो यांनी केली. 

भाजीपाला व आले, लसूण हे जिन्नसही महाग झालेले आहे. भाजपा सरकारच्या कारकिर्दीत तसे पाहता खाण्या-पिण्याच्या सर्वच वस्तू महाग झालेल्या आहेत. राज्यात काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत कांद्याचा भाव रु.70 रुपये झालेला असताना भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी, अरूण जेटली आदींनी आंदोलने छेडून महागाईविरोधात सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी फलोत्पादनाच्या गाळ्यांवर लोकांना 25 रुपये दराने कांदा उपलब्ध करून देऊन उर्वरीत 50 रुपये सरकारने दिले होते. त्याच धर्तीवर आता भाजपाच्या सरकारने लोकांना स्वस्त किंमतीत कांदा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. कुतिन्हो यांनी केली. 

सध्या ख्रिस्ती धर्मीयांचा नाताळचा सण व नवीन वर्षाचा महोत्सव जवळ आलेला आहे. घरी गृहिणींना रुचकर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी कांद्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने कांदा प्रती किलो 20 रुपये दराने उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या राज्यांत कांदा महाग का?

देशात आणि गोव्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. गोव्यात कांद्याचा भाव प्रती किलो 120 रुपये आहे. कोलकाता येथे प्रती किलो 70 रुपये आहे. मुंबईत प्रती किलो 100 रुपये आहे. तर मध्य प्रदेशमध्ये कांदा प्रती किलो 30 रुपये आहे. तसेच राजस्थान, पंजाबमध्ये लोकांना स्वस्त दरात कांदा मिळत आहे. काँग्रेसची सरकारे असलेल्या राज्यांत लोकांना कांदा स्वस्त किंमतीत मिळत असून भाजपाची सरकारे असलेल्या राज्यांत कांद्याच्या किंमती चारपटीने महाग का? असा सवाल अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी उपस्थित केला.