Fri, May 29, 2020 21:20होमपेज › Goa › वाळपईत काँग्रेसतर्फे म्हादई जागोर आंदोलन

वाळपईत काँग्रेसतर्फे म्हादई जागोर आंदोलन

Last Updated: Nov 06 2019 1:44AM

हादईप्रश्नी निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारी.पणजी : प्रतिनिधी

म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून तिचे पाणी वळवण्याचा कुटिल डाव रचणार्‍या भारतीय जनता पक्षाला सत्तरीची जनता योग्य धडा शिकवेल, असा इशारा गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यश गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी वाळपईत म्हादई जागोर आंदोलनावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित सभेत दिला.

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकला पर्यावरण दाखला देण्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने या म्हादई जागोर आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी वाळपई उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. 

चोडणकर म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मनमानी करून चालवीत आहेत. कळसा भांडुरा प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरण दाखल्याची कल्पना नसल्याचे वक्तव्य केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केल्याने हे सिद्ध झाले आहे की सर्व केंद्रीय मंत्र्यांचे ट्वीटर खाते पंतप्रधान कार्यालय व भाजप मुख्यालयातून हाताळले जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिशाभूल करणारी  विधाने करीत आहेत. 

वाळपईचे स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांनी भाजप सरकारच्या कटकारस्थानावर एकही शब्द काढलेला नाही. वाळपईतले लोक म्हादईच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे माहीत असूनही ते गप्प असल्याची टीकाही त्यांनी केली. 

वाळपई महिला काँग्रेस गट अध्यक्ष रोशन देसाई म्हणाल्या, सत्तरीच्या सर्व महिलांना बरोबर घेऊन आम्ही आमच्या आई म्हादईचे रक्षण करण्यासाठी रणरागिणी बनून रस्त्यावर येऊ व भाजपचा कपटी डाव हाणून पाडू. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रिय मंत्री जावडेकर यांनी गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष गुरूदास नाटेकर, काँग्रेसचे नेते रणजित राणे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, प्रदेश काँग्रेस सचिव अमना नाईक तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.