Sun, May 31, 2020 15:31होमपेज › Goa › ‘मगो’चा काँग्रेसला पाठिंबा 

‘मगो’चा काँग्रेसला पाठिंबा 

Published On: Apr 12 2019 2:03AM | Last Updated: Apr 12 2019 12:17AM
पणजी : प्रतिनिधी
भाजपा आघाडी सरकारला घटक पक्ष म्हणून असलेला पाठिंबा अजूनही मागे न घेतलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.  
पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समितीने गुरूवारी यासंबंधी निर्णय घेतल्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘मगो’च्या केंद्रीय कार्यकारिणी समितीची बैठक सांतीनेज येथील ‘मगो’च्या मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीसंबंधी माहिती देताना सांवत यांनी  सांगितले की, कार्यकारिणी समितीत लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक सदस्यांनी भाजपने युती पक्ष असलेल्या मगोशी केलेल्या वर्तणुकीबाबत नापसंती व्यक्त केली. ‘मगो’च्या राज्यभरातील कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी मित्र पक्षाकडून ‘मगो’चा घात झाल्याबद्दल संताप व्यक्त केला. 

आम्ही शत्रूपक्षाशी नेहमीच लढत आलो असलो तरी, भाजपसारख्या मित्रपक्षाने मगो नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून दोन आमदारही पळवून नेल्याबद्दल ‘मगो’प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याविषयी सर्व ‘मगो’ कार्यकर्त्यांचे तसेच पदाधिकार्‍यांचे म्हणणे समजून घेतल्यावर भाजपला धडा शिकवण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे, लोकसभेपुरता भाजपला कोणताही पाठिंबा न देण्याचा ठराव गुरूवारच्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेस हा मगोचा विरोधी पक्ष असला तरी, यंदाच्या लोकसभा निवडणुकीपुरते काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन आणि उत्तर गोव्याचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोटनिवडणुकीसंबंधी विचारणा केली असता सावंत म्हणाले की, शिरोडा मतदारसंघात मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर रिंगणात असून त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे कार्यकारिणीने आधीच ठरविले होते. ‘मगो’चे म्हापशाचे माजी उमेदवार विनोद फडके यांनी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले असून त्यालाही कार्यकारिणीने मान्यता दिली आहे.  मांद्रे मतदारसंघात अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांच्याबरोबर ‘मगो’चे तेथील स्थानिक कार्यकर्ते व काही पदाधिकारीही उघडपणे प्रचार करत आहेत. मांद्रे पोटनिवडणुकीत  ‘मगो’ कार्यकारिणीने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा निर्णय येत्या चार-पाच दिवसांत घेतला जाणार आहे. मात्र ‘मगो’चे स्थानिक कार्यकर्ते निराश होणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. 

दरम्यान, 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर   मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापण्यास ‘मगो’ने  पाठिंबा दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या भाजप आघाडी सरकारात निवडणुकीनंतर युती करणार्‍या ‘मगो’ने आता दोन वर्षांनी  स्वतंत्र मार्ग पत्करून भाजपला धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली  आहे. पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपने ‘मगो’चे मुख्य नेते तथा मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे तत्कालीन मंत्री सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रिपदही दिले होते. 

मात्र, मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोडा पोटनिवडणुकीत भाजपच्या  सुभाष शिरोडकर यांच्याविरूद्ध उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपने  सुदिन ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. 

‘मगो’चा पाठिंबा निरर्थक; लवू मामलेदार

मडगाव  : जिथे सत्ता, तिथे सुदिन ढवळीकर असतात, हे सर्वांना कळून चुकले आहे, त्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन काहीच फरक पडणार नसून तो निरर्थक ठरेल, अशी प्रतिक्रिया फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी व्यक्त केली आहे.

मगो पक्षाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर  मामलेदार म्हणाले की, जिथे सत्ता तिथे ढवळीकर ही त्यांची वृत्ती आहे. कोणतेही सरकार असो ते स्वतःची पोळी भाजून घेण्यात पटाईत आहेत. पूर्वी काँगे्रसचे  सरकार  होते त्यावेळी ढवळीकर तिथे होते, त्यानंतर भाजप सरकार आले त्यावेळीही ते सरकारात होते. त्यांना जे हवे ते मिळवून घेण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. प्रसंगी ते विरोधातही काम करू शकतात, हे त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीत दाखवून दिले आहे. ढवळीकर बंधू हे संधीसाधू आहेत हे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या निर्णयाने काहीच फरक पडणार नाही. स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणाचाही वापर करू शकतात. लोकांना आता त्यांची वृत्ती कळून चुकली असून लोक त्यांच्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत, असे मामलेदार यांनी सांगितले.

आपल्याला पुन्हा राजकारण नको आहे. पण सरकारला मार्गदर्शन करण्यास आपण तयार आहे. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करण्याविषयी आपण निर्णय घेतलेला नाही, असे मामलेदार म्हणाले. सध्या राज्याला बहुजन समाजाचा मुख्यमंत्री लाभलेला आहे. त्यांना आम्ही पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे सांगून स्वार्थी राजकारण्यांपासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहनही लवू मामलेदार यांनी केले.