Tue, May 26, 2020 05:33होमपेज › Goa › गोवा : खासदार श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्रिमंडळात 

गोवा : खासदार श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्रिमंडळात 

Published On: May 31 2019 1:54AM | Last Updated: May 31 2019 1:54AM
पणजी : प्रतिनिधी 

गोव्यातून निवडून आलेले भाजपचे एकमेव खासदार श्रीपाद नाईक यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सलग दुसर्‍यांदा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी नाईक यांना राज्यमंत्रिपदाची (स्वतंत्र प्रभार) आणि गोपनीयतेची शपथ दिली. हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या खासदार श्रीपाद नाईक यांनी हिंदीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर नाईक यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले.
शपथविधी सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईक यांना भेटीला बोलावून त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविषयी त्यांना माहिती दिली. नाईक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल गोव्यातील मंत्री, आमदार, भाजप कार्यकर्ते आणि नाईक यांच्या हितचिंतकांनी आनंद व्यक्‍त केला आहे. दिल्ली येथील शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी उपस्थिती लावली होती. नाईक यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाच्या वार्तेमुळे गोव्यातील अनेक कार्यकर्ते आणि श्रीपादभाऊ यांचे कुटंबीय, नातेवाईक व मित्रांनी दिल्लीत उत्साहाने शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. 

उत्तर गोवा मतदारसंघातून श्रीपाद नाईक सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांचा हा विक्रम आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर श्रीपाद नाईक यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यावेळी आयुष खात्याचे राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आले होते. मोदी सरकारने आयुष हे खाते नव्याने निर्माण केले होते. त्याचे प्रथम नेतृत्व करण्याचा मान श्रीपाद नाईक यांना मिळाला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली योग जागतिक स्तरावर नेण्यात श्रीपाद नाईक यांचे मोठे योगदान आहे.

गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण : मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खासदार श्रीपाद नाईक यांचे मोदी मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सावंत यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे की, श्रीपाद नाईक यांच्या मोदी सरकारच्या सलग दुसर्‍या कारकिर्दीतील मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल अभिनंदन. हा गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याला पुन्हा केंद्रीय मंत्रिपद बहाल केल्याबद्दल त्यांचे आभार.