Mon, May 25, 2020 02:53होमपेज › Goa › सरकारी कार्निव्हलला आमदार सरदेसाईंचे आव्हान  

सरकारी कार्निव्हलला आमदार सरदेसाईंचे आव्हान  

Last Updated: Feb 20 2020 2:29AM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा
शासकीय कार्निव्हलचे  आयोजन फातोर्ड्यात करायला परवानगी न दिल्याने नाराज असलेल्या आमदार विजय सरदेसाई यांनी मडगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या सरकारमान्य कार्निव्हलला थेट आव्हान दिले असून त्यांच्या व्ही फॉर फातोर्डातर्फे शनिवारी फातोर्ड्यात कार्निव्हल ब्लास्ट 2020 या संगीत रजनीच्या कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली. तर रविवारी मडगाव शहरात कार्निव्हल समिती कडून शासकीय कार्निव्हल मिरवणूक आयोजित करण्यात आलेली आहे. दोन्ही समित्यांनी बुधवारी निरनिराळ्या पत्रकार परिषदा घेऊन याबाबत माहिती दिली असून, आम्ही मडगावात आयोजित करण्यात येणार्‍या  शासकीय कार्निव्हल मिरवणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा फातोर्डा फॉरवर्डच्या दहा नगरसेवकांनी दिला.

मडगाव कार्निव्हल समितीचे अध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनी बुधवारी सकाळी मडगावात पत्रकात परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. गोवा फॉरवर्ड पक्षाचा एकही नगरसेवक आर्थुर डिसिल्वा यांच्या परिषदेला उपस्थित नव्हता. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी आमदार विजय सरदेसाई यांनी नगराध्यक्षा पूजा नाईक, उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज मिळून फातोर्डा फॉरवर्डच्या दहा नगरसेवकांबरोबर पत्रकार परिषद घेऊन दी बिग फॅ ट फातोर्डा कार्निव्हल ब्लास्ट 2020 या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

आर्थुर डिसिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव कार्निव्हल समितीतर्फे 23 फेब्रुवारी रोजी पालिका चौकात चित्ररथ  मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्‍त शनिवार, सोमवार व मंगळवार असे तीन दिवस मडगाव नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागांमध्ये ‘खेळ तियात्र’  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यंदा कार्निव्हलनिमित्त आयोजित  स्पर्धांमध्ये बहुतेक चित्ररथ भाग घेणार   आहेत. 23 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून मडगाव येथील होली स्पिरिट चर्च जवळून कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात होणार असून हॉस्पिसियो इस्पितळ, जुने जिल्हाधिकारी संकुल, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक, असा  मिरवणुकीसाठी मार्ग ठरविण्यात आलेला आहे. शेवटी पालिकेजवळ उभारण्यात येणार्‍या मंडपाजवळ मिरवणुकीची सांगता  होेणार आहे. सदर मिरवणुकीमध्ये पोर्तुगीजांचा प्रभाव असलेली गोमंतकीय परंपरा, वारसास्थळे आदी गोष्टीचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

कार्निव्हलच्या जल्लोषाला 22 फेब्रुवारीपासून सुरवात होणार असून पालिकेच्या सर्व 25 ही प्रभागांमध्ये नामवंत  कलाकारांद्वारे खेळ तियात्रच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मिरवणुकीत सहभागी होणार्‍या प्रत्येक चित्ररथांची तपासणी करण्यात येणार असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी  डिसिल्वा यांनी केले. यंदा कार्निव्हल दरम्यान, आयोजित करण्यात येणार्‍या स्पर्धांसाठी एकूण 7 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत तर 5 लाख रुपये खेळ तियात्र आयोजित करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. समाजासाठी एखाद्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी   सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे,मात्र काहीजण अजूनही दुसर्‍यांच्या शब्दावर चालत आहेत, असे दिसून येत आहे ,असे ते म्हणाले.या पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी अजित पंचवाडकर,भाजपचे नगरसेवक रुपेश महात्मे,केतन कुरतरकर, काँग्रेस च्या नगरसेविका डोरिस टेक्सेरा,मनोज मसुरकर व इतर उपस्थित होते.

मडगाव कार्निव्हल समितीच्या पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्या गटातील नगराध्यक्षा पूजा नाईक,उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज व इतर नगरसेवकांबरोबर पत्रकार परिषद घेऊन शनिवारी पासून व्ही फॉर फातोर्डा यांच्या कडून आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय कार्यक्रमांची माहिती दिली. सरदेसाई म्हणाले,की 22 पासून 25 फेब्रुवारीपर्यंत जुन्या मार्केट सर्कल जवळ कार्निव्हल ब्लास्ट या संगीत रजनीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बँड आपली कला सादर करणार आहेत. गत वर्षी प्रमाणे आम्ही जनमत कौल सर्कल जवळ कार्निव्हल आयोजित करण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता.पण राजकीय दबावाखाली असलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी नाकारल्याने आम्ही दुसर्‍या जागी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.एकीकडे पणजीत मुख्य रस्त्यावर सरकारकडून संगीत रजनीच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाते, आणि फातोर्ड्यात वाहतूक खोळंब्याचे कारण देऊन परवानगी नाकारली जात असल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यंदाचा कार्निव्हल शासकीय कार्निव्हलपेक्षा वेगळा करण्यासाठी रोहित रॉय,सलिल अंकोला, शाहवर अली,भूमिका सिंग,दलिप ताहील,नावेद जेफ्री, निहारीका कुमारी आणि साक्षी कलानी या् बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित करण्यात आल्याची माहितीही सरदेसाई यांनी दिली.