होमपेज › Goa › आमदार दिगंबर कामत यांना खाण घोटाळा प्रकरणी समन्स

आमदार दिगंबर कामत यांना खाण घोटाळा प्रकरणी समन्स

Published On: Nov 15 2017 1:47AM | Last Updated: Nov 14 2017 11:50PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण घोटाळ्याप्रकरणी   माजी  मुख्यमंत्री  दिगंबर कामत यांना  गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)  मंगळवारी  21 रोजी  चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले आहे. कामत  यांच्यासह   खाण मालक प्रफुल्‍ल हेदे यांना शनिवारी (दि. 18), खाण खात्याच्या  सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ शोभना रिवणकर यांना गुरुवारी (दि.16) बोलावण्यात आले आहे, अशी माहिती  एसआयटीच्या  सूत्रांनी दिली. 

खाण खात्याचे  माजी प्रधान सचिव राजीव यदुवंशी यांची आज (बुधवारी)  पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी त्यांची  शुक्रवारी (दि. 10) व शनिवारी (दि.11)कसून चौकशी करण्यात आली होती. यदुवंशी हे 2007  ते 2011 या काळात खाण खात्याचे प्रधान  सचिव होते. सध्या ते दिल्‍लीत आरोग्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.  माजी  मुख्यमंत्री  दिगंबर कामत हे खाण मंत्रीदेखील होते. खाण घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी 2014 साली त्यांची खाण घोटाळ्याचा तपास करणार्‍या एसआयटी पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली होती.  

खाण घोटाळ्याप्रकरणी मागील आठवड्यात  खाण खात्याचे सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ  रामनाथ शेटगावकर यांना अटक  करण्यात आली होती. त्यानंतर आता खाण खात्याच्या सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ शोभना रिवणकर यांना चौकशीसाठी हजर रहावे, असे समन्स बजावण्यात आले आहे.