Wed, May 27, 2020 17:12होमपेज › Goa › आमदार सोपटे यांनी स्वीकारला जीटीडीसी अध्यक्षपदाचा ताबा

आमदार सोपटे यांनी स्वीकारला जीटीडीसी अध्यक्षपदाचा ताबा

Published On: Jun 12 2019 1:18AM | Last Updated: Jun 12 2019 1:18AM
पणजी : प्रतिनिधी

मांद्रे मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दयानंद सोपटे यांनी मंगळवारी  गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी) अध्यक्षपदाचा ताबा घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी उपस्थित राहून सोपटे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आपण मिळालेल्या जबाबदारीवर समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया सोपटे यांनी अध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर दिली. 

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यात खाण व्यवसायानंतर सध्या पर्यटन हा महसूलासाठी महत्त्वाचा पर्याय आहे. राज्यात वर्षाकाठी 60 ते 70 लाख पर्यटक  येतात.  त्यामुळे केवळ सन, सँड आणि सी इतकेच नव्हे तर ग्रामीण भाग, सांस्कृतिक पर्यटन विकसित करणे आवश्यक आहेे.  

पर्यटकांसाठी 100 टक्के पायाभूत सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. राज्यातील बोंडला हे अभयारण्य गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित झाले आहे. अन्य राज्यांमध्ये अभयारण्यांचा प्रसार पर्यटनासाठी केला जातो. गोव्यात हे फार कमी प्रमाणात होते. अभयारण्याला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करायची गरज आहे, असेही सावंत यांनी सांगितले. 

वन, जलस्त्रोत खाते व अन्य खात्यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन विकसित झाले पाहिजे.   सोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटक  नक्कीच वाढतील. सोपटे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन महामंडळ अधिक उंचीवर जाईल, असा विश्‍वास सावंत यांनी व्यक्त केला. 

या आधी महामंडळाने सुरु केलेल्या अ‍ॅम्फिबियस बस, हॉट एअर बलून व अन्य सेवांचे पुनरावलोकन केले जाईल. राज्यात होणारा प्रत्येक प्रकल्प हा कायम रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सुरू केला जातो. यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. पर्यावरणाच्या नावाखाली प्रत्येक प्रकल्पाला विरोध केला जातो. पर्यावरणाची काळजी सरकारला आहे. त्यामुळे केवळ विरोध न करता जनतेने नवीन प्रकल्पांसाठी सरकारला सहकार्य करावे, असेही, सावंत यांनी सांगितले. 

सोपटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर विश्‍वास ठेऊन ही जबाबदारी दिली आहे. त्यांच्या  विश्‍वासाला पात्र ठरणार. भाजप जे देतो ते ठरवून व विचार करुन देतो. त्यामुळे ही जबाबदारी संभाळणे आपले कर्तव्य असून आपण यात समाधानी आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी मंत्री निलेश काब्राल यांच्याकडे जीटीडीसी महामंडळ होते. काब्राल यांना अतिरिक्‍त खात्यांमध्ये पर्यावरण व विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते देण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडे वीज आणि अपारंपरिक ऊर्जा अशी खाती आहेत.