Wed, May 27, 2020 17:16होमपेज › Goa › लोकसभा निवडणुक : प्रदेश भाजपची तयारी सुरू

लोकसभा निवडणुक : प्रदेश भाजपची तयारी सुरू

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:33AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीचे ‘लक्ष्य’ नजरेसमोर ठेवून राज्यातील सर्व मतदारसंघांतील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी गोवा प्रदेश भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या शनिवारपासून  राज्यभरात दौरा करणार असून मे महिन्यापर्यंत सर्व चाळीसही मतदारसंघांना ते भेटी देणार असल्याचे गोवा प्रदेश भाजप कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. 

भाजपाच्या राज्यस्तरीय पदाधिकार्‍यांनी  गुरुवारी दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्याला भेट दिली व तयारीचा आढावा घेतला.  सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी काही पदाधिकार्‍यांसोबत दौर्‍याचे नियोजन केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांचा दौरा 13 रोजी (शनिवारी) सकाळी नऊ वाजता  सुरू होणार आहे. आगोंद ‘कम्युनिटी हॉल’मध्ये मुख्यमंत्री जनतेशी सुसंवाद साधणार आहेत. नंतर श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुन देवस्थानला भेट देणे तसेच दुपारी खोतीगाव पंचायत सभागृहात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधतील, असे पक्षाने जाहीर केले आहे.  फेब्रुवारी व मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

पंचायत मंत्री  गुदिन्होंचा भाजप कार्यकर्त्यांशी  वार्तालाप 

भाजपच्या विविध मंत्र्यांनी पणजीतील पक्ष कार्यालयांत पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा कार्यक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे.  पंचायत मंत्री माविन गुदिन्हो हे  गुरुवारी प्रथमच भाजपच्या कार्यालयात उपस्थित राहिले. डिचोली, मये व अन्य काही मतदारसंघांतील ग्रामपंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मंत्री गुदिन्हो यांची भेट घेऊन पंचायत क्षेत्रातील विकासकामांविषयी माहिती दिली.