Wed, May 27, 2020 17:43होमपेज › Goa › लोकसभा ७५; पोटनिवडणूक ७८ टक्के मतदान

लोकसभा ७५; पोटनिवडणूक ७८ टक्के मतदान

Published On: Apr 24 2019 1:37AM | Last Updated: Apr 24 2019 1:37AM
पणजी : प्रतिनिधी

लोकसभेच्या गोव्यातील दोन जागांसाठी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी 74.64 टक्के मतदान झाले. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर (भाजप), माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन (काँग्रेस) यांसह बारा उमेदवारांचे भवितव्य ‘इव्हीएम’मध्ये बंदिस्त झाले. राज्य विधानसभेच्या तीन मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीत सरासरी 78.77 टक्के मतदान झाले असून सुभाष शिरोडकर (भाजप), दीपक ढवळीकर (मगोप), महादेव नाईक (काँग्रेस) या माजी मंत्र्यांसह 16 जणांना मतदारांनी दिलेला कौलही मतदानयंत्रांत बंद झाला.

 लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील कुंकळी भागातील एका मतदान केंद्रावर चाचणीच्या वेळी मतदान केलेल्या उमेदवाराऐवजी भाजपच्याच उमेदवाराला मते जमा झाल्याचे आढळून आल्याने तेथील मतदान प्रक्रिया अडीच तास खोळंबली. अन्य काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड आढळल्याने अर्धा ते तासभर मतदान थांबले हे अपवाद वगळता इतरत्र मतदान सुरळीत पार पडले.

गोव्यातील लोकसभेच्या उत्तर गोवा मतदारसंघात 76.40 टक्के तर दक्षिण गोवा मतदारसंघात 72.89 टक्के मतदान झाले होते. मागील 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदान 76.86 टक्के झाले असून यंदा मतदानात 4.82 टक्के घट झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी मांद्रे मतदारसंघात 80.61 टक्के, म्हापसामध्ये 82.99 टक्के आणि शिरोडामध्ये 80.09 टक्के मतदान झाले आहे. तिन्ही पोटनिवडणुकीत सरासरी 78.77 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयुक्‍त कुणाल (आयएएस) यांनी दिली. 

राज्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकांसाठी सरासरी 13 टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत सर्वसाधारण हाच वेग होता. उत्तर गोव्यात लोकसभेसाठी त्यानंतर मतदानाचे प्रमाण वाढत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 72 टक्के मतदान नोंदले गेले. दक्षिण गोव्यात गती थोडी मंदावत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 68 टक्के मतदान झाले. शिरोडा, म्हापसा व मांद्रे विधानसभा मतदारसंघांत संध्याकाळी मतदानाची गती वाढली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तेथील मतदानाने 75 टक्क्यांचा टप्पा पार केला. 

राज्यातील प्रमुख नेत्यांनी सकाळच्या सत्रात मतदान केले. भाजपचे दोन्ही खासदार व उमेदवार श्रीपाद नाईक व नरेंद्र सावईकर तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी पत्नीसह मतदान केले. उत्तर गोव्याचे लोकसभा उमेदवार गिरीश चोडणकर यांनी दक्षिण गोव्यातील फातोर्डा येथे मतदान केले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर, विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार जोशुआ डिसोझा, सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे आदी प्रमुख नेत्यांनी तसेच राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सकाळच्या सत्रात मतदान केले. 

राज्यात एकूण 1652 मतदान केंद्रे आहेत. लोकसभेसाठी राज्यात मंगळवारी पहिल्या चार तासांत चांगली सुरवात झाली. राज्यभरात सकाळी 11 वाजेपर्यंत लोकसभेसाठी 26.50 टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यात 26.52 आणि दक्षिणेत 26.58 टक्के 11 वाजेपर्यंत मतदान पार पडले. पोटनिवडणुकीसाठी शिरोडा 29.16 टक्के, म्हापसा 26.81 टक्के व मांद्रे 25.60 टक्के अशी टक्केवारी प्राप्त झाली असून पोटनिवडणुकीसाठी एकूण टक्केवारी 27.19 टक्के झाली असल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले. 

पणजी शहरात सकाळी 11 वाजेपर्यंत शांततेने मतदान सुरू होते. कामराभाट येथील प्राथमिक शाळेमध्ये तीन मतदान केंद्रे असून हे केंद्र नेहमीच संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये गणले जाते. शाळेच्या बाहेरही पोलिसांचा पुरेपूर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या केंद्राबाहेरील वडाच्या झाडाखाली लोकांनी गर्दी केली होती. कामराभाट येथील बुथ क्रमांक- 39, 40 आणि 41 मध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 27.78, 27.88 आणि 35.86 टक्के मतदान झाले होते. येथील फार्मसी कॉलेजात दोन मतदान केंद्रे असून त्यात सकाळी 11 वाजेपर्यंत बुथ क्रमांक-24 मध्ये 30.69 टक्के तर बुथ क्रमांक-22 मध्ये 29.40 टक्के मतदान झाले होते. शहरातील मासांदो आमोरी मतदान क्रमांक-8 आणि 9 मध्ये महिला मतदारांची संख्या अधिक होती. 

 लोकसभेसाठी दुपारी 1 पर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी 45.11 झाली. यात उत्तर गोवा 46.26 टक्के, दक्षिण गोवा 43.97 टक्के मतदान झाले. लोकसभेसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत हे मतदान, एकूण टक्केवारी 57.61 झाले. उत्तर गोवा 58.3 टक्के आणि दक्षिण गोवा 56.93 टक्के मतदान झाले .

58 ईव्हीएम यंत्रे बदलली

लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी विविध ठिकाणी मतदान यंत्रे, बॅलट युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला. लोकसभेसाठी मुख्य मतदान सुरू होण्याआधी घेण्यात येणार्‍या चाचणी मतदानावेळी उत्तर गोव्यात 49 आणि दक्षिण गोव्यात 29 यंत्रे मिळून 78 यंत्रे बदलण्यात आली.  मुख्य मतदान सुरू  झाल्यावर त्यामानाने कमी यंत्रे बिघडली होती. मतदानाच्या पूर्ण दिवसभरात उत्तर गोव्यात 24 आणि दक्षिणेतील 34 यंत्रे मिळून 58 यंत्रे बदलण्यात आली. एकूण यंत्रांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी असल्याचे मत निवडणूक आयुक्‍त कुणाल यांनी व्यक्‍त केले. 

म्हापशात एकजण ताब्यात

भरारी पथकाने केलेल्या  कारवाईत म्हापसा मतदान केंद्राच्या बाहेर दारू व पैसे वाटप करताना डायगो डिसोझा नामक बार मालकाला ताब्यात घेण्यात आले.