Mon, May 25, 2020 09:30होमपेज › Goa › कर्नाटकाप्रमाणे आम्हालाही सत्तास्थापनेसाठी आमंत्रण द्या

कर्नाटकाप्रमाणे आम्हालाही सत्तास्थापनेसाठी आमंत्रण द्या

Published On: May 18 2018 1:38AM | Last Updated: May 18 2018 1:38AMपणजी : प्रतिनिधी

कर्नाटकाच्या राज्यपालांनी जसे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले, तशी संधी गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसलादेखील द्यावी,  या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस आपल्या सर्व 16 आमदारांची  दोनापावला येथे राजभवनात राज्यपाल मृदुला सिन्हा  यांच्यासमोर दुपारी 12 वाजता परेड  करणार आहे, अशी माहिती काँगे्रस प्रवक्ते अ‍ॅड. यतिश नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे प्रदेश काँग्रेसने आज शुक्रवार, दि.18 रोजी सकाळी 10 वाजताची वेळ मागितली होती. मात्र, राज्यपालांच्या कार्यालयातून दुपारी 12 वाजताची वेळ देण्यात आली. राज्यपालांनी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिल्यास काँग्रेस आपले बहुमत विधानसभेत येत्या सात दिवसांत  सिद्ध करेल, असा विश्‍वासही नाईक यांनी  व्यक्त केला.

अ‍ॅड. नाईक म्हणाले, 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत   17 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष  म्हणून  समोर आला होता. मात्र राज्यपालांनी काँग्रेसऐवजी  13 जागा जिंकलेल्या भाजपला सरकार  स्थापनेचे आमंत्रण दिले. भाजप सत्तेत  असला तरी अजूनही राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे.

काँग्रेसची विधानसभेत सात दिवसांत बहुमत सिध्द करण्याची तयारी आहे. यासाठी राज्यपालांनी विधानसभेचे खास अधिवेशन बोलवावे. कर्नाटकच्या राज्यपालांप्रमाणे गोवा राज्यपालांनीदेखील सर्वात मोठ्या पक्षाला बहुमत सिध्द करण्यास बोलवावे,  अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  राज्यात नसल्याने सध्या प्रशासन ठप्प झाले आहे. राज्याचा कारभार दिशाहिन बनला असून  मंत्रिमंडळाच्या बैठका होत नसल्याने राज्याच्या हितासंदर्भात महत्वाचे निर्णयदेखील होत नाहीत.  मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्रिमंत्री  सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात सदर समिती म्हणजे  केवळ फार्स असल्याची टीकाही अ‍ॅड. नाईक यांनी केली.  यावेळी आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते.

आमदारांना निर्देश 

आपल्या सर्व आमदारांनी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली राजभवनात जाण्यास तयार रहावे, असे निर्देश  काँग्रेसश्रेष्ठींनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आमदारांना आपल्यासोबत  त्यांच्या मतदारसंघांतील  नेत्यांनाही सोबत आणण्यास सांगण्यात आले आहे.