Sun, Apr 21, 2019 05:45होमपेज › Goa › विविध पंचायतक्षेत्रात स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमींची कमतरता

विविध पंचायतक्षेत्रात स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमींची कमतरता

Published On: Nov 08 2018 1:24AM | Last Updated: Nov 08 2018 1:24AMपणजी :  प्रतिनिधी

गोव्यातील अनेक पंचायत क्षेत्रांमध्ये  हिंदू स्मशानभूमी, ख्रिश्‍चन दफनभूमी व मुस्लिम कब्रस्तानांची कमतरता असल्याने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदन आझाद जमातुल मुस्लिम कल्याण  ट्रस्टच्या वतीने   केंद्रीय   अल्पसंख्याक मंत्री  मुख्तार अब्बास नक्‍वी यांना पाठविण्यात आले  असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष  सय्यद मन्झुर काद्री यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली.

निवेदनावर  गोवा सरकारच्या वतीने मुख्य सचिवांना उत्तर देण्यास  अपयश आल्याने   राष्ट्रीय   अल्पसंख्याक आयोगाकडून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. काद्री म्हणाले,  राज्यातील  191 पंचायतींपैकी  174 पंचायतींमध्ये   मुस्लिम बांधवांसाठी  कब्रस्तान, 43 पंचायतींमध्ये हिंदूंसाठी  स्मशानभूमी तर   50 पंचायत क्षेत्रामध्ये  ख्रिश्‍चनांसाठी   दफनभूमी नाही. त्यामुळे लोकांची बरीच गैरसोय होते.  येत्या  काही वर्षात  लोकसंख्येत आणखी  वाढ होणार असल्याने  भविष्यात    अंत्यसंस्कारासाठी  सुविधांची स्थीती अधिक गंभीर होण्याची भीती आहे.

स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमींसाठी जागांची कमतरता असल्याने  गंभीर समस्या उद्भावली आहे. याबाबत   मानवाधिकार आयोगाकडे ट्रस्टतर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु सरकारच्या वतीने त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे आता सदर प्रश्‍नी  केंद्रीय मंत्री नकवी यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री नकवी यांनी राज्यातील या परिस्थितीची  गंभीर दखल घेत ही तक्रार राष्ट्रीय अल्पसंख्यक  आयोगाकडे वर्ग केली. त्यानंतर आयोगाने  मुख्य सचिवांना सात दिवसांत त्यावर उत्तर द्यावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. परंतु मुख्यसचिवांना  उत्तर देण्यास अपयश आल्याने आयोगाकडून  पुढील कारवाई केली जाणार असल्याचे काद्री यांनी  स्पष्ट केले.

कब्रस्तानात उद्यानाला विरोध 

पणजी येथील 3 हजार 200 चौरस मीटर्स जागेत असलेल्या  मुस्लिम कब्रस्तानच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तेथील खुल्या जागेत   उद्यान उभारण्याचा घाट पणजी मनपाकडून घालण्यात आल्याचा आरोप आझाद जमातुल मुस्लिम कल्याण  ट्रस्टचे अध्यक्ष  सय्यद मन्झुर काद्री यांनी केला. उद्यानासाठी एक इंचही जागा  देणार नाही. उद्यानाला विरोध करणार्‍यांच्या सुमारे 550 सह्यांचे निवेदन मनपाला सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.