Thu, Jul 02, 2020 14:19होमपेज › Goa › गोवा : क्वारंटाईन केंद्रातील भोजनात भ्रष्टाचार - जितेश कामत

गोवा : क्वारंटाईन केंद्रातील भोजनात भ्रष्टाचार - जितेश कामत

Last Updated: May 27 2020 8:14PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांमध्ये लोकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. या केंद्रांमध्ये जेवण पुरविणार्‍या हॉटेल्सकडे संपर्क साधून चौकशी केली असता, जेवणातील एकूण खर्चातील ४० टक्के या ठिकाणी नेमलेल्या सरकारी अधिकार्‍यांना द्यावे लागत असल्याचे हॉटेलवाल्यांनी सांगितले. यावरून कोरोनाच्या वाईट प्रसंगातही प्रशासनाचा भ्रष्टाचार सुरूच असल्याचे दिसून येते, अशी टीका शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

कामत म्हणाले, की कोरोनामध्ये सामान्य माणसावर बिकट प्रसंग ओढवला आहे. अशावेळी देखील सरकारी अधिकार्‍यांनी हप्ता घेऊन भ्रष्टाचार करणे सोडलेले नाही. क्वारंटाईन केंद्रातील लोकांना फारच कमी दर्जाचे जेवण दिले जात आहे. अधिकार्‍यांना ४० टक्क्यांची लाच द्यावी लागत असल्याने जेवणाचा दर्जाच कमी करावा लागत आहे. अन्यथा जेवण पुरविणे परवडणारे नसल्याचे हॉटेलवाले सांगत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी कामत यांनी केली. 

मुख्यमंत्री सावंत यांनी सरकारमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा, मुख्यमंत्र्यांचीही या कारभाराला मुक संमती असल्याचे लोकांनी मान्य करावे. या संदर्भात लाच घेणार्‍या अधिकार्‍यांची माहिती सरकारला हवी असल्यास आपण सहकार्य करायला तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करावी, असेही कामत यांनी सांगितले.