Tue, May 26, 2020 09:37



होमपेज › Goa › म्हादई, सीएए, ड्रग्ज आदी मुद्द्यांवर सरकारला घेरणार

म्हादई, सीएए, ड्रग्ज आदी मुद्द्यांवर सरकारला घेरणार

Last Updated: Jan 28 2020 12:22AM




पणजी : पुढारी वृत्तसेवा
येत्या 3 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हादई, सीएए, ड्रग्ज, कायदा व सुव्यवस्था, बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती यांसारख्या विषयावरून सरकारला घेरले जाणार आहे. राज्यासमोर उभ्या असलेल्या अनेक गंभीर प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली जाणार आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सोमवारी पर्वरी येथील विधानसभा संकुलात विरोधी पक्षनेत्याच्या कक्षात पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कामत म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष तसेच अन्य विरोधी पक्षांचे सदस्य मिळून एकत्रितपणे सरकारवर दबाव आणणार आहेत. राज्य सरकारने जनतेचा आवाज ऐकावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी सोमवारी झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या आमदारांना जनतेच्या हिताचे विषय उपस्थित करण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाल्या पाहिजेत, अशी विनंती आपण सभापतींना केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाची बैठक येत्या गुरूवारी विरोधी पक्षनेत्याच्या कक्षात संध्याकाळी 4 वाजता आयोजित केली जाणार आहे. येणार्‍या अधिवेशनात विरोधी काँग्रेस आमदारांंकडून कोणती रणनीती अवलंबली जावी, यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे कामत यांनी सांगितले.