Thu, May 28, 2020 07:00होमपेज › Goa › 'भाजपने निवडलेला मार्ग हा मनोहर पर्रीकरांचा नव्हे'

'भाजपने निवडलेला मार्ग हा मनोहर पर्रीकरांचा नव्हे'

Published On: Jul 11 2019 2:47PM | Last Updated: Jul 11 2019 2:47PM
पणजी : पुढारी ऑनलाईन

गोव्यात झालेल्या राजकीय घडामोडीत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे दहा आमदार पक्षत्याग करून भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे ४० सदस्यसंख्या असलेल्या गोवा विधानसभेत भाजपचे संख्याबळ २७ वर पोहोचले आहे. गोव्यातील या राजकीय घडामोडीवर गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.

''माझ्या वडिलांनी जो मार्ग निवडला होता, त्यापेक्षा निश्चितपणे हा वेगळा मार्ग आहे. ज्यावेळी १७ मार्च रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी मला जाणीव झाली की त्यांनी निवडलेला मार्ग संपला आहे. मात्र, गोमंतकीयांना काल याची जाणीव झाली'', असे उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याच दरम्यान उत्पल यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे त्यांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. 

उत्पल पर्रीकर राजकारणात सक्रिय नाहीत. सक्रिय राजकारणात उतरण्याबाबत आपण योग्य वेळी निर्णय घेऊ,असे  उत्पल पर्रीकर यांनी याआधी स्पष्ट केले होते.

शेजारील कर्नाटकातील काँग्रेस आमदारांच्या फुटीचे राजकीय नाट्य रंगात आले असतानाच गोव्यातही तसाच राजकीय भूकंप झाला आहे. राज्यात काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष असून काँग्रेसकडे एकूण पंधरा आमदारांचे संख्याबळ आहे. यातील प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व रवी नाईक असे पाच आमदार वगळता उर्वरित दहा आमदार भाजपमध्ये बुधवारी संध्याकाळी दाखल झाले. खुद्द विरोधी पक्षनेता आपल्या पक्षातील आमदारांना घेऊन  फुटण्याची गोव्याच्या राजकीय इतिहासातील ही दुसरी घटना आहे.