Fri, May 29, 2020 22:02होमपेज › Goa › मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीचा वा नंतरचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ जारी करा : देशप्रभू

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीचा वा नंतरचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ जारी करा : देशप्रभू

Published On: Oct 30 2018 1:30AM | Last Updated: Oct 30 2018 1:30AMपणजी : प्रतिनिधी

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीचा किंवा नंतरचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा  व्हिडीओ जारी करुन जनतेला त्यांच्या आरोग्याची माहिती द्या, अशी मागणी  प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते जितेंद्र देशप्रभू यांनी पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्री पर्रीकर  यांच्या खासगी निवासस्थानावर घेण्यास कायद्याची संमती आहे का? मंत्रिमंडळ बैठकीसाठी त्यांचे हे निवासस्थान अधिसूचित करण्यात आले का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

देशप्रभू म्हणाले, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी स्वत: मुख्यमंत्री पर्रीकर यांना  ‘स्वादूपिंडाचा कर्करोग’ झाल्याचे  सांगितले आहे.  त्यांना हा आजार आता झाला, की फेब्रुवारी महिन्यातच झाला होता हे जनतेला कळायला हवे. त्यांच्या आरोग्याबाबत सरकारकडून नेहमीच  वेगवेगळी विधाने करुन दिशाभूल करण्यात आली, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना  जर  कर्करोग झाला असेल तर त्यांच्या तब्येतीबाबत माहिती देण्यासाठी  सरकारने  दर आठवड्याला ‘हेल्थ बुलेटीन’ जारी करावे. पर्रीकर हे  गोव्याचे  मुख्यमंत्री  आहेत, केवळ त्यांच्या कुटुंबीयांचे नाहीत. मंत्रिमंडळ बैठक  31 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.  पर्रीकर हे स्वत: यात निर्णय घेण्यास सक्षम आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी  मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीचा किंवा नंतरचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा  व्हिडीओ जारी  करावा. अन्यथा काँग्रेससमोर न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचेही  देशप्रभू यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री खरेच उपस्थित आहेत का?  हे समजणे आवश्यक आहे.  त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे ओएसडी बैठक घेत असतील तर तो लोकशाहीचा खून आहे. दिल्‍ली येथील एम्स इस्पितळातून गोव्यात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची कुठलीच माहिती  समोर आलेली नाही. याचा अर्थ काय होतो, असा सवालही  देशप्रभू यांनी उपस्थित केला.

सह्यांची फॉरेन्सिक तपासणी करा : देशप्रभू

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बनावट सह्या विविध सरकारी फाईल्सवर केल्या जात असल्याचा संशय असल्याने सह्यांची फॉरेन्सिक तपासणी करावी, अशी मागणी जितेंद्र देशप्रभू यांनी केली. मुख्यमंत्री पर्रीकर हे फेब्रुवारी 2018 पासून आजारी आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच्या व त्यानंतरच्या त्यांच्या सह्यांची पडताळणी  होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.