होमपेज › Goa › धनगरांच्या घर बांधकामाची चौकशी करा

धनगरांच्या घर बांधकामाची चौकशी करा

Published On: Jan 10 2019 1:44AM | Last Updated: Jan 10 2019 1:44AM
पेडणे : प्रतिनिधी 

धनगर समाजाच्या घरांची पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी करून धनगरांच्या समस्या ऐकून घेऊन अधिकार्‍यांना धारेवर धरले. या घरांच्या बांधकामाची चौकशी करण्याचा आदेश दिला. चार अभियंत्यांची समिती नेमण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. त्या चार अभियंत्यापैकी धनगर समाज बांधवांनी एक अभियंता सुचवावा समितीने अहवाल लवकरच सादर करावा, असे आदेशही मंत्री मनोहर  आजगावकर यांनी  दिले.

धनगर समाज बांधवांच्या घराबाबत दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी राहतील व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही मंत्री आजगावकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना मंगळवारी सायंकाळी धनगर समाज बांधवांच्या घरांची पाहणी केल्यानंतर दिला.

मोपा विमानतळ प्रकल्प जागेतील एकूण 14  धनगर कुटुंबीयांना नवीन घरे बांधून मागील महिन्यात या घरांच्या चाव्या दिल्या होत्या. 

या घरांच्या बांधकामाविषयी पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त करून अधिकार्‍यांना धारेवर धरले तसेच घराची पाहणी करून या घरांची दुरुस्ती करा, असा आदेश यावेळी दिला. सुरुवातीला धनगर बांधवांनी आपल्या समस्या मंत्री बाबू आजगावकर यांना ऐकविल्या. मंत्री बाबू आजगावकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकारी,  विमान प्राधिकरणाचे अधिकारी शानबाग तसेच अन्य अधिकार्‍यांना सांगितले की यापुढे अशी चूक आपण खपवून घेणार नाही.  विमान प्राधिकरणाचे आधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, जीएमआरचे आधिकारी  आणि खासगी अभियंते जे धनगर समाजाच्यावतीने असेल असे एकूण चार अभियंत्याची समिती नेमून या 14  ही घरांची पाहणी केली जाईल, जोपर्यंत ही समिती योग्य आणि चांगल्या प्रकारचे काम झाले, असा अहवाल सादर करत नाही, तोपर्यंत धनगर समाजातील कुटुंब त्या घरात राहणार नाही. तोपर्यंत बाजूच्या गोठयात राहण्याची विनंती ही मंत्री बाबू आजगावकर यांनी धनगर  कुटुंबीयांना केली. वारखंड नागझर पंचायतीचे सरपंच प्रदीप कांबळी,  माजी  नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू, माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप पटेकर, पंचायत सदस्य संजय तुळसकर, कंत्राटदार नासर आणि  जी. एम. आर कंपनीचे अधिकारी मिलिंद पैंदरकर  यावेळी उपस्थित होते.  

पूर्वीचीच घरे द्या : धनगर कुटुंबांची भूमिका

या  घरांच्या छताचे सिमेंट ठिकठिकाणी पडत असून अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.या भीतीपोटी धनगर कुटुंबीयांनी आपला संसार नवीन घरात मांडण्यापेक्षा गोठ्यात मांडला. या घरांची कागदपत्रे त्यांना मिळालेली नाहीत, ही घरे आम्हाला नको पूर्वीच्या जागी घरे द्या, शिवाय आमची झाडेही परत द्या, अशी भूमिका धनगरांनी घेतली होती.