Tue, May 26, 2020 07:52होमपेज › Goa › शिरोडा हल्ल्यातील जखमीचे निधन; खुनाचा गुन्हा दाखल

शिरोडा हल्ल्यातील जखमीचे निधन; खुनाचा गुन्हा दाखल

Last Updated: Dec 15 2019 1:24AM
फोंडा : प्रतिनिधी

शिरोडा येथे गुरूवारी मानशीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात शिरोडा पंचायत सदस्य सुहास नारायण नाईक (वय 56) याने हळदय- शिरोडा येथील राजेंद्र पुंडलिक नाईक (50) याला गंभीर जखमी केले होते. राजेंद्र नाईक याच्यावर बांबोळी गोमेकॉत उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास त्याचे निधन झाले. 

मानशीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र नाईक याला बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचे निधन झाले. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नावरून आता थेट खून केल्याचा गुन्हा संशयित सुहास नाईक याच्यावर नोंदवण्यात आला आहे.

मानशीच्या प्रकरणावरून गुरुवारी येथे सुरू असलेल्या उत्सवावेळी सुहास व राजेंद्र या दोघांचेही कडाक्याचे भांडण झाले. त्यात सुहास नाईक याने राजेंद्र नाईक याच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले होते. पण उपचार सुरू असताना राजेंद्रचे शनिवारी निधन झाले. 

याप्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयित सुहास नारायण नाईक याला शुक्रवारी अटक केली होती. त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे अधिक तपास करीत आहेत.