Tue, May 26, 2020 06:12होमपेज › Goa › गोव्यातील उद्योग सोमवारपासून सुरू होणार

गोव्यातील उद्योग सोमवारपासून सुरू होणार

Last Updated: Apr 18 2020 8:16AM

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतपणजी : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यात लागू असलेले काही निर्बंध येत्या 20 एप्रिलपासून शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीतल्या उद्योगांना 20 एप्रिलपासून व्यवहार सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी या उद्योजकांना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना लागू करणे व ‘गोवा औद्योगिक विकास महामंडळा’च्या (जीआयडीसी) व्यवस्थापकाकडून परवाना घेणे बंधनकारक राहणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात अनुक्रमे पंचायत आणि पालिकेकडून परवानगी घेऊन घर दुरुस्ती व शाकारणीची कामेही करता येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावरील पत्रकार परिषदेत सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधान सचिव पुनित गोयल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत राज्यातील औद्योगिक वसाहत संघटना, उद्योजक संघटनांशी चर्चा केली आहे. बैठकीत ठरल्यानुसार सुरक्षित अंतर, सॅनिटायझेशन आदी गोष्टींचे पालन करून राज्यातील उद्योगांना व्यवहार सुरू करता येतील. मात्र, त्यासाठी ‘गोवा औद्योगिक विकास महामंडळा’च्या व्यवस्थापकाकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी मामलेदार वा जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीची गरज नाही. मात्र, उद्योग सुरू करताना परराज्यांतून कामगार आणायला मिळणार नाही. राज्यातच असलेल्या कामगारांकडून काम करून घ्यावे लागेल. परराज्यातील कामगारांना राज्यात प्रवेशाबाबत 3 मेनंतरच निर्णय घेतला जाणार आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात अनेक भागात घरांची कामे करण्यासाठी याआधी परवाना देण्यात आला असून नव्याने घरदुरुस्तीची कामेही सुरू आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत बंद पडलेली घरदुरुस्तीची कामे पुन्हा सुरू करण्यासाठी आता पंचायत सचिवाकडून आणि पालिकेच्या मुख्याधिकार्‍याकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. हा परवाना दुरुस्तीसाठी रेती, खडी वा अन्य वस्तूंची ने-आण करण्यासाठीही वापरता येणार आहे. राज्यातील सामान्य लोकांना मदत व्हावी म्हणून राज्य सरकारने हे पाऊल टाकले आहे. 

राज्यातील सरकारी कार्यालयेही 20 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे एक हजार ‘थर्मल गन’ विकत घेण्यात येणार आहेत. सुरक्षेचे सर्व उपाय राज्य सरकार स्वत: पाळणार असून कुठेही शिथिलता ठेवू दिली जाणार नाही. येत्या सोमवारपासून, सरकारी कर्मचार्‍यांना आणण्यासाठी कदंब बरोबरच खासगी बसेसचाही वापर केला जाणार असून या बसेसमध्ये केवळ 30 ते 40 टक्के प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून आणले जाणार आहे. उद्योगांतही येणार्‍या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासण्यासाठी सदर ‘थर्मल गन’ तैनात करण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

राज्यातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून सुमारे 5 लाख घरांना सरकारी कर्मचार्‍यांनी भेट दिली आहे. गोमेकॉचे डॉ. जगदीश काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती या सर्वेक्षणाचा अहवाल तयार करत आहे. या सर्वेक्षणात ‘सारी’ अथवा ‘इन्फ्लुएंजा’ सारख्या श्वासोच्छ्वासासंबंधी आजाराशी साधर्म्य आढळलेल्या सुमारे 25 ते 30 हजार लोकांची नोंद झाली आहे. या लोकांची अथवा त्यांच्या कुटुंबामध्ये आधीच्या प्रवासाचा इतिहास आहे का , याची तपासणी सुरू आहे. या संशयित लोकांचे ‘स्क्रीनिंग’ करून ‘कोरोना’संबंधित चाचणी केली जाणार आहे. या सर्वेक्षणामुळे, शेवटच्या टप्प्यातही कोणी संशयित कोरोना रुग्ण आहे का, याचा तपशील प्राप्त होणार आहे. सुमारे सात हजार सरकारी कर्मचार्‍यांनी यशस्वीरीत्या सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. 

‘कोरोना’विरोधी लढ्याबाबत, राज्यातील सुमारे 191 ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह आपण शुक्रवारी एक तास ‘व्हीडिओ कॉन्फरसिंग’द्वारे चर्चा केली. आपणाला सुमारे 45 जणांनी प्रश्न विचारले, त्यातील सुमारे 15 सरपंचांच्या प्रश्नांना आपण उत्तरे दिली. शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून हे भयकारी चित्र आहे. या लोकांचा राज्यात शिरकाव होऊ नये म्हणून सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून भाजी व अन्य जीवनावश्यक वस्तू घेऊन येणार्‍या गाड्यांची व त्यातील लोकांची आरोग्यविषयक कडक तपासणी केली जात आहे. केरी गावातील चेकपोस्टवर आपण गुरूवारी रात्री पाहणी केली असता, नेहमीच्या 180 गाड्यांऐवजी सुमारे 300 गाड्या नियमित येत असल्याचे आढळून आल्याने आपणही आश्चर्यचकित झालो असून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. 

विनामास्क वावरण्यास बंदी

येत्या 20 एप्रिलनंतर सार्वजनिक अथवा खुल्या जागी कोणालाही तोंडावर मास्क न घालता फिरता येणार नाही. सदर मास्क विकतच घेण्याची गरज नसून घरगुती मास्कलाही मान्यता देण्यात येणार आहे. मास्क न घालता घराबाहेर पडणार्‍यांना दंड आकारण्यासाठी पोलिसांबरोबर सरकारी कर्मचार्‍यांनाही तैनात करण्याचा सरकारचा विचार आहे. सार्वजनिक जागेत चारहून अधिक माणसे एकत्र येण्यास, गुटखा वा तंबाखू खाण्यास, मद्यप्राशन करण्यास, थुंकण्यासही बंदी घालण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

नव्या गाड्यांची खरेदी नाही

राज्य सरकारच्या मंत्री आणि अन्य सरकारी अधिकार्‍यांसाठी आलिशान गाड्या घेण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असली तरी हा नियमित कामकाजाचा भाग होता. गाड्या घेण्याचा निर्णय 2011 साली घेण्यात आला होता, त्याची अधिसूचना केवळ आता निघाली आहे. याचा अर्थ आपण अथवा कुणी मंत्री महागड्या गाड्या खरेदी करणार आहे, असा होत नाही. आपण 35 लाखांची गाडी घेणार असल्याचे वृत्त खोटे असून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर वापरत असलेलीच गाडी आपण आजही वापरत आहोत. सदर अधिसूचना जारी केली गेली असली तरी राज्य सरकार त्याचे पालन करणार नाही, असा खुलासा मुख्यमंत्री सावंत यांनी शुक्रवारी केला.