Wed, Jul 08, 2020 12:02होमपेज › Goa › भारतीय चित्रपटांना जगातील सर्व महोत्सवांत पसंती

भारतीय चित्रपटांना जगातील सर्व महोत्सवांत पसंती

Published On: Sep 07 2019 2:02AM | Last Updated: Sep 07 2019 2:02AM
पणजी : प्रतिनिधी

भारतीय चित्रपटांनी जागतिक स्तरावर चित्रपट निर्मितीत नवीन मानदंड निर्माण केले आहेत. जगातील सर्व मान्यवर चित्रपट महोत्सवात भारताच्या चित्रपटांना पसंती दिली जाते, असे प्रतिपादन कॅनडातील भारताचे उच्चायुक्‍त विकास स्वरूप यांनी केले.

44 व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 मध्ये ‘इंडिया पॅव्हेलियन’चे स्वरूप यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. या समारंभात गोव्यात या वर्षी होणार्‍या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) सुवर्ण महोत्सवानिमित्त पोस्टर आणि माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले आहे. 

कॅनडातल्या टोरंटो येथे 5 ते 15 सप्टेंबर पर्यंत होत असलेल्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारतीय उद्योग महासंघ संयुक्‍तपणे सहभागी झाले आहेत. भारतीय प्रतिनिधी मंडळात चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अतिरिक्‍त महासंचालक चैतन्य प्रसाद आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव धनप्रीत कौर यांचा समावेश आहे. इंडिया पॅव्हेलियनच्या या उद्घाटन समारंभात चित्रपट निर्मिती आणि चित्रपट महोत्सवाशी संबंधित सुमारे 60 मान्यवर उपस्थित होते. यावेळी इफ्फीतील सहभागासह विविध विषयांवर चर्चा झाली.

कॅनडामध्ये भारतीय समुदाय मोठ्या संख्येने असल्यामुळे भारतीय सिनेमाबद्दल अनेकांना स्वारस्य आहे. यावेळी उपस्थितांनी गोव्यात नियोजित इफ्फी महोत्सवात होणार्‍या विविध कार्यक्रमांबाबत उत्सुकता दर्शवली. गोव्यात होणार्‍या या महोत्सवाला उपस्थित राहायला इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले असल्याचे आयोजकांनी सांगितले.