Wed, Jul 08, 2020 13:38होमपेज › Goa › दूध उत्पादकांचे गोवा डेअरीसमोर बेमुदत उपोषण

दूध उत्पादकांचे गोवा डेअरीसमोर बेमुदत उपोषण

Published On: Jul 10 2019 1:38AM | Last Updated: Jul 09 2019 11:36PM
फोंडा : प्रतिनिधी

दूध उत्पादकांना गाईच्या दुधाला लिटरमागे पाच रुपये दरवाढ द्यावी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. सी. सावंत यांना त्वरित हटवावे, या दोन प्रमुख मागण्या घेऊन मंगळवारी अनुप देसाई व संजीव कुंकळ्येकर या दोन दूध उत्पादकांनी कुर्टी येथील गोवा डेअरी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात दोन गायींचाही समावेश करण्यात आला आहे. 

दूध उत्पादकांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा अनुप देसाई यांनी दिला. या आंदोलनात गायींना नुकसान झाल्यास त्याला सरकार आणि गोवा डेअरी जबाबदार असेल असेही उपोषणकर्त्यांनी सांगितले. आज दोन गायी आणल्या आहेत, गरज भासल्यास आणखी 30 गायी गोवा डेअरीसमोर आणल्या जातील, असे उपोषणकर्ते अनुप देसाई यांनी सांगितले. उपोषण आंदोलनामुळे गोवा डेअरीसमोर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 

अनुप देसाई यांना अन्य दूध उत्पादकांनी पाठिंबा दिला असून नानोडा दूध संस्थेचे प्रमोद सिद्धये तसेच आमठाणे दूध संस्थेचे वैभव परब यांचा त्यात समावेश आहे. 
यासंबंधी पत्रकारांशी बोलताना अनुप देसाई यांनी गोवा डेअरी व्यवस्थापनाकडून दूध उत्पादकांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप करून स्वतः सातव्या वेतन आयोगाची अपेक्षा धरणार्‍या या लोकांकडून दूध उत्पादकांना मात्र दूध दरवाढ करण्याबाबत चालढकल केली जात असल्याचा आरोप केला. 

दूध उत्पादकांच्या मेहनतीवरच गोवा डेअरीचा कारभार चालत असून दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष हे गोवा डेअरीला मारक असल्याचे अनुप देसाई यांनी सांगितले. गोवा डेअरीवर सध्या व्यवस्थापकीय संचालक असलेले एन. सी. सावंत हे भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप अनुप देसाई यांनी करून सावंत यांना आधी हटवा, अशी मागणी केली. जोपर्यंत दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असून परिणामाला सरकार आणि गोवा डेअरी जबाबदार असेल, असे अनुप देसाई यांनी सांगितले.