Thu, Jul 02, 2020 15:30होमपेज › Goa › राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन नोव्हेंबरमध्ये अशक्य : मुख्यमंत्री

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन नोव्हेंबरमध्ये अशक्य : मुख्यमंत्री

Published On: Jul 25 2019 1:49AM | Last Updated: Jul 25 2019 12:01AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे  स्पर्धेच्या आयोजनासाठी जानेवारी  नंतरच्या  तारखा द्याव्यात, अशी विनंती इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला केली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बुधवारी प्रश्‍नोत्तर तासात सांगितले.नुवेंचे आमदार विल्फ्रेड डिसा यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी पायाभूत सुविधा तयार आहेत का या प्रश्‍नावर उत्तर देताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राष्ट्रीय  क्रीडा स्पर्धेच्या तारखा निश्‍चित झालेल्या नाहीत. त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी होणार्‍या संघांचीही आवश्यक ती तयारी झालेली नाही. त्यामुळे या स्पर्धांचे आयोजन नोव्हेंबर  2019 मध्ये करणे अशक्य आहे. तयारीसाठी किमान पाच महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याने जानेवारी 2020 नंतरच्या तारखा इंडियन  ऑलिम्पिक असोसिएशनने द्यावात, अशी विनंती करण्यात आली आहे.

क्रीडा मंत्री बाबू आजगावकर म्हणाले, की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या बहुतेक पायाभूत सुविधा  तयार आहेत.ऑगस्ट महिन्या पर्यंत शक्य झाल्यास त्यांचे उद्घाटन देखील केले जाईल. 
या स्पर्धेच्या तारखा  निश्‍चित झाल्यानंतर विविध सुविधा पुरवण्यासंदर्भात निविदा मागवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पायाभूत सुविधा तसेच अन्य गोष्टींवर मिळून एकूण 600 ते 650 कोटी रुपये खर्च येणार आहे.राज्य सरकारला आता पर्यंत केंद्राकडून  97 कोटी रुपयांचा निधी या स्पर्धेसाठी देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

८० कोटी गेले कुठे?

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी केंद्र सरकारने 2009 ते 2012 या काळात दिलेले 80 कोटी रुपये गेले कुठे, असा प्रश्‍न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित केला.गोव्याला दिलेला हा निधी कुठे वळवण्यात आला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण या निधीतून ज्या पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक होते, त्या देखील उभारण्यात आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.