Thu, May 28, 2020 20:07होमपेज › Goa › कळसा भांडुरा परवानाप्रश्‍नी अनभिज्ञ

कळसा भांडुरा परवानाप्रश्‍नी अनभिज्ञ

Last Updated: Nov 05 2019 12:56AM

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातर्फे निवेदन देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत. सोबत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, विनय तेंडुलकर, दिगंपणजी : प्रतिनिधी

राज्यातून दिल्‍लीला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची सोमवारी भेट घेऊन, पर्यावरण मंत्रालयाने कळसा-भांडुरा जलप्रकल्पासंबंधी ‘कर्नाटक निरावरी निगम लि.’ला देण्यात आलेल्या परवानगीचे पत्र चुकीच्या पद्धतीने देण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून दिले. जावडेकर यांनी सदर पत्रासंबंधी आपण पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे सांगून, पुढील दहा दिवसांत त्यासंबंधी लेखी स्पष्टीकरण देण्याचे वचन दिले आहे. शिष्टमंडळातील सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मंत्री जावडेकर यांनी गोवा आणि गोमंतकीयांच्या हिताच्या रक्षणासाठी आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाने आधी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकाच्या कळसा-भांडुरा जलप्रकल्पाला दिलेली मान्यता देणारे पत्र मागे घ्यावे, असे निवेदन जावडेकर यांना दिले. यानंतर, जावडेकर यांनी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सर्व सदस्यांनी कर्नाटकाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सदर प्रकल्प हा पिण्याच्या पाणी वापरासाठी असल्याची चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली आहे, असे सांगितले. कळसा-भांडुराचे पाणी हे कसेही करून मलप्रभा नदीत वळवण्याचा कर्नाटकाचा डाव आहे. याउलट, मलप्रभा प्रकल्प हा जलसिंचन प्रकल्प असून या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण कायद्यानुसार, पर्यावरण मूल्यांकन अहवाल (ईआयए) तयार करणे आवश्यक आहे. यामुळे सदर मंत्रालयाकडून 17 ऑक्टोबर-2019 रोजी देण्यात आलेला परवाना हा चुकीच्या माहितीवर आधारीत असून सदर आदेश मागे घ्यावा, असे निवेदन शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना सादर केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

म्हादई संदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटण्यासाठी दाखल झालेल्या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांसहित केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, उपाध्यक्ष दुर्गादास कामत, मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव, म्हादई बचाव आंदोलनच्या नेत्या निर्मला सावंत आणि राजेंद्र केरकर सामील होते. 

‘म्हादईसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा’
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बैठकीनंतर सांगितले की, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून तिच्या संरक्षणासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत आम्ही लढा देणार असल्याचे आपण बैठकीत सांगितले. यावर, कळसा -भांडुरा प्रकल्पाला आपल्या मंत्रालयाकडून कोणताही परवाना दिला असल्याबद्दल काहीही माहिती नसल्याचे जावडेकर यांनी सांगितले. याविषयी आपण चौकशी करून दहा दिवसांत मंत्रालयाची बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे कामत म्हणाले.